डिलीव्हरीसाठी दिलेल्या सव्वाकोटीच्या दागिन्यांचा अपहार
अपहारासह फसवणुकीप्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ डिसेंबर २०२४
मुबई, – डिलीव्हरीसाठी दिलेल्या सुमारे सव्वाकोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्यासह कंपनीची फसवणुक झाल्याचा प्रकार शेख मेमन स्ट्रिट परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ज्वेलर्स व्यापार्याकडे कामाला असलेल्या सोहेल बालगार या कामगाराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या सोहेलच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अविनाश रंगराव सरदार हे बदलापूरच्या बेलवली, श्री कॉम्प्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहतात. सध्या ते शेख मेमन स्ट्रिट, मुंबादेवी डायमंड प्रिमायसेसच आदिरा गोल्ड या कंपनीत कामाला आहे. ही कंपनी ज्वेलर्स व्यापार्यांना होलसेलमध्ये सोन्याच्या दागिन्यांची विक्री करते. काही दिवसांपूर्वी विपुल ठक्कर यांनी कंपनीला काही सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर दिली होती. ३० ऑगस्टला सुमारे दिड कोटीचे १६०० ग्रॅम वजनाचे विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने विपुल ठक्कर यांच्या कार्यालयात डिलीव्हरीसाठी त्यांचा कामगार सोहेल बालगार यांना पाठविण्यात आले होते. मात्र सोहेल सोन्याच्या दागिन्यांची डिलीव्हरी न करता पळून गेला होता.
हा प्रकार नंतर अविनाश सरदार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सोहेलला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नव्हता. गेल्या चार महिन्यांपासून ते त्याला सतत संपर्क साधत होते, मात्र तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. काही दिवसांनी सोहेलने त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला होता. सुमारे दिड कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन सोहेलने कंपनीची फसवणुक केली होती. त्यामुळे मालकाच्या आदेशानंतर अविनाश सरदार यांनी सोहेलविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंगळवारी १७ डिसेंबरला त्याच्याविरुद्ध दागिन्यांचा अपहारासह फसवणुकीचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या सोहेलचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तो त्याच्या राहत्या गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच त्याच्या गावी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.