दागिने बनविण्यासाठी दिलेले सोने घेऊन कारागिरांचे पलायन
अपहाराच्या स्वतंत्र गुन्ह्यांत दोन कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ डिसेंबर २०२४
मुंबई, – दागिने बनविण्यासाठी दिलेले सोने घेऊन दोन कारागिरांनी पलायन केल्याची घटना काळबादेवी आणि झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या दोन्ही कारागिारांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. निमाय मंडल आणि बिनय खान अशी या दोघांची नावे असून या दोघांनी सुमारे ५६ लाखांच्या सोन्याचा अपहार करुन दोन व्यापार्यांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सुब्रता बसनता दंडपत हे वसई परिसरात राहत असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. झव्हेरी बाजार येथील मोहसीन मंझिलच्या पाचव्या मजल्यावर त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा एक कारखाना आहे. या कारखान्यात ज्वेलर्स व्यापार्यांकडून सोने घेऊन त्यांनी दिलेल्या डिझाईनप्रमाणे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम चालते. त्यांच्याकडे पंधरा कारागिर असून ते सर्वजण कोलकाता येथील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील रहिवाशी आहे. निमाय हा गेल्या नऊ वर्षांपासून तिथे काम करत होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. काही दिवसांपूर्वी त्याने त्याचे भाचे सूर्या मंडल आणि सागर मंडल यांना तिथे कामावर ठेवले होते. ते दोघेही त्याच्या हाताखाली दागिने बनविण्याचे काम शिकत होते. कारागिरांना सोने दिल्यानंतर सायंकाळी त्यांनी बनविलेले दागिने कारखान्यांतील तिजोरीत ठेवले जात होते.
४ नोव्हेंबरला त्यांना रुद्रा गोल्डचे मालक गिरीश देवीचंद रावल यांनी ४७९ सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. ते सोने त्यांनी निमायला दिले होते. दहा ते बारा दिवसांत दागिने बनवून देतो असे निमायने सांगितले होते. १७ नोव्हेंबरला निमाय हा त्याच्या दोन्ही भाच्यासोबत कारखान्यातून निघून गेला आणि परत आला नाही. ते तिघेही सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले सुमारे ३६ लाखांचे सोने घेऊन पळून गेले होते. जवळपास एक महिना त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. कारखान्यातील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर निमाय हा जेवणाच्या डब्ब्यातून सोने घेऊन पळून गेल्याचे दिसून आले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ते फुटेज पोलिसांना सादर करुन निमायविरुद्ध तक्रार केली होती.
दुसरी घटना काळबादेवी परिसरात घडली. नित्यानंद श्रीष्ठुधर बाग यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा काळबादेवी येथे एक कारखाना आहे. त्यांच्याकडे बिनय हा गेल्या दोन वर्षांपासून कारागिर म्हणून कामाला होता. सप्टेंबर महिन्यांत त्यांनी त्याला ४६८ ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. त्यापैकी २४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बनवून त्याने त्यांना दिले होते. उर्वरित सुमारे वीस लाखांचे २४८ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन तो पळून गेला होता. ३ ऑक्टोंबरला तो सोने कटींग करुन येतो सांगून बाहेर गेला आणि आलाच नाही. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. तो सोने घेऊन पळून गेल्याची खात्री होताच नित्यानंद बाग यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी निमाय आणि बिनय या दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. ते दोघेही मूळचे कोलकाताचे रहिवाशी असून सोने घेऊन ते त्यांच्या गावी पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची एक टिम लवकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.