२८.६४ लाखांच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
दिल्लीसह मुंबईतील दोन ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ जानेवारी २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या २८ लाख ६४ हजार रुपयांच्या सोन्याचा दागिन्यांचा अपहार करुन दोन ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकणी एल. टी मार्ग पोलिसांनी दिल्लीतील एका व्यापार्यासह दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सुरिंदरसिंग साव्हनी आणि विकास ऊर्फ योगेश सुरेशकुमार बाफना अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशीसाठी होणार असून त्यासाठी त्यांना समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विकास आणि सुरिंदरसिंग यांनी अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
रामलाल भुरारी गडारी हे ज्वेलर्स व्यापारी असून ते सांताक्रुज येथे राहत असून झव्हेरी बाजार, शेख मेमन स्ट्रिट परिसरात त्यांच्या मालकीचे महावीर गोल्ड नावाचे एक शॉप आहे. ते बुलियन ज्वेलर्स व्यापार्याकडून शुद्ध सोने घेऊन या सोन्याचे दागिने बनवून होलसेलमध्ये विक्री करतात. ललित जैन हे त्यांच्या परिचित ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचाच योगेश बाफना हा नातेवाईक आहे. योगेशशी ललित यांनी त्यांच्याशी ओळख करुन दिली होती. त्याने स्वतचा सोन्याचा व्यवसाय सुरु केला होता. त्याच्या बहिणीचे मार्च २०२३ रोजी लग्न होते. त्यासाठी त्याला काही सोन्याच्या दागिन्यांची गरज होती. त्यामुळे त्याने त्यांना काही दागिन्यांची ऑर्डर दिली होती. जून २०२२ रोजी रामलाल गडारी यांनी विकास बाफनाला टप्याटप्याने २३ लाख ८४ हजार रुपयांचे १८७ ग्रॅम व २५० ग्रॅम वजनाचे बाजूबंद, हार, अंगठी, मंगळसूत्र, हाताचे पंजाची डिझाईन ब्रेसलेट, चैन, मोती माळ आदी दागिने दिले होते. काही दिवसांनी त्याने त्यांना अडीच लाखांचे पेमेंट केले होते. मात्र २१ लाख ३४ हजार रुपयांचे पेमेंट दिले नाही. सतत विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. या दागिन्यांचा अपहार करुन विकासने त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच रामलाल गडारी यांनी विकास बाफनाविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार खोकन राकोहरी रॉय हे भाईंदर परिसरात ाहत असून त्यांचा झव्हेरी बाजार येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. जून २०२४ दिल्लीतील एका दागिन्यांच्या प्रदर्शनात त्यांची ज्वेलर्स व्यापारी सुरिंदरसिंगशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्याकडे सव्वाआठ लाखांचे सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर दिली होती. त्यासाठी त्याने त्यांना आगाऊ नव्वद हजार रुपये पाठवून दिले होते. उर्वरित पेमेंट दागिन्यांच्या डिलीव्हरीनंतर देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना सोन्याचे दागिने पाठवून दिले होते. मात्र दिलेल्या मुदीतत त्यांनी सव्वासात लाखांचे पेमेंट न करता त्यांची फसवणुक केली होती. पेमेंटसाठी सुरिंदरसिंगकडून टोलवाटोलवी सुरु असल्याचे लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांतील सुरिंदर सिंग व योगेश बाफना या दोघांना लवकरच पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स बजाविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.