मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ जानेवारी २०२५
मुंबई, – गळ्यातील सोन्याचे नेकलेस बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे २५ लाखांचे शुद्ध सोने घेऊन एका कारागिराने पलायन केले. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी पळून गेलेला कारागिर आकाश अरुण सांमता याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याच्या अटकेसाठी पाोलिसांचे एक पथक त्याच्या कोलकाता येथील गावी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिरजीत गोपाळ घोष हे कॉटनग्रीन येथे राहत असून त्यांचा दादी शेठ अग्यारी लेन, दोगड इमारतीमध्ये सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. ते विविध ज्वेलर्स व्यापार्याकडून सोने घेऊन त्यांना दागिने बनवून देण्याचे काम करतात. याकामी त्यांच्याकडे काही कारागिर असून या कारागिराकडून ते सोन्याचे दागिने बनवून घेत होते. त्यासाठी त्यांना ज्वेलर्स व्यापार्याकडून काही रक्कम कमिशन किंवा शुद्ध सोने दिले जात होते. त्यांच्या कारखान्यात आकाश सांमता हा कारागिर म्हणून कामाला होता २४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी आकाशला २५ लाख रुपयांचे ३५६ ग्रॅम वजनाचे सोने गळ्यातील नेकलेस बनविण्यासाठी दिले होते. १० जानेवारीपर्यंत नेकलेस बनवून देण्याचे त्याने त्यांना आश्वासन दिले होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे ३ जानेवारीला आकाश हा त्याचे दोन्ही मोबाईल बंद करुन नेकलेस बनविण्यासाठी दिलेले सोने घेऊन कारखान्यातून पळून गेला होता.
हा प्रकार नंतर चिरजीत यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला संपर्क साधण्यचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्याचा मोबाईल बंद येत होता. नेकलेस बनविण्यासाठी दिलेले २५ लाख ३३ हजार रुपयांचे सोने घेऊन आकाश हा पळून गेल्याचे लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आकाशचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. तो मूळचा कोलकाता येथील मेदनापरू, दासपूरचा रहिवाशी आहे. मुंबईतून पळून तो त्याच्या गावी पळून गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक लवकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले.