२.१२ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

तीन व्यापार्‍याच्या तक्रारीनंतर तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – कोट्यवधी रुपयांच्या सोन्याचा अपहार करुन काळबादेवी, भुलेश्‍वर आणि झव्हेरी बाजार परिसरातील तीन ज्वेलर्स व्यापार्‍यांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी तीन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिवसिंग टँक, अजीत बाबूराव जाधव आणि बिरेंद्रनाथ दास अशी या तिघांची नावे असून या तिघांवर २ कोटी १२ लाख ७३ हजार रुपयांच्या सोन्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

विकास नवरतनमल गन्ना हे ज्वेलर्स व्यापारी असून ते ट्रक टर्मिनस रोड परिसरात राहतात. त्यांचा काळबादेवी येथील राजा गोवर्धन बन्सीलाल इमारतीमध्ये सोन्याचा होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी शिवसिंग टँक हा त्याचा परिचित व्यापारी आहे. तो तेलंगणाच्या सिंकदराबादचा रहिवाशी असून तिथे त्याचा सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत त्याने विकास गन्ना यांच्याकडून क्रेडिटवर २२०० ग्रॅम वजनाचे २ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांचे दागिने घेतले होते. त्यापैकी ३८ लाख ५० हजार रुपयांचे पेमेंट त्याने त्यांना दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत उर्वरित १ कोटी ७८ लाख ९१ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. वारंवार विचारणा करुनही त्याने त्यांना पेमेंट केले नाही किंवा त्यांचे सोन्याचे दागिने परत केले नव्हते. शिवसिंगने क्रेडिटवर घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याचे लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

दुसर्‍या गुन्ह्यांतील तक्रारदार माणिकराव परशराम साळुंखे हे नवी मुंबईतील सानपाड्यातील रहिवाशी आहेत. झव्हेरी बाजार येथे त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. ऑक्टोंबर २०२१ ते जानेवारी २०२५ या कालावधीत त्यांनी महावीर मेसर्चचे भागीदार अजीत बाबूराव जाधव यांना १९ लाख ६० हजार रुपयांचे ४०० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने सोनसाखळी बनविण्यासाठी दिले होते. मात्र त्यांनी सोनसाखळी न बनविता त्यांनी दिलेल्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. याबाबत वारंवार अजीत जाधवकडे विचारणा करुनही त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. काही दिवसांनी तो मोबाईल बंद करुन पळून गेला होता.

तिसर्‍या गुन्ह्यांतील तक्रारदार कृष्णापदो रामप्रसाद जाना हे सोन्याचे व्यापारी आहेत. ते भुलेश्‍वर येथे राहत असून त्यांचा तिथेच स्वतचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यांत त्यांनी बिरेंद्रनाथ दास याला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी शुद्ध सोने दिले होते. त्यापैकी काही दागिने त्याने त्यांना बनवून दिले, मात्र १३ लाख २२ हजार रुपयांचे दागिने न देता त्यांची फसवणुक केली.

या तिघांनी दिलेल्या तक्रार अर्जाची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात संबंधित आरोपींनी सोन्याचा परस्पर करुन तिन्ही व्यापार्‍यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर एल. टी मार्ग पोलिसांनी शिवसिंग टँक, अजीत जाधव आणि बिरेंद्रनाथ दास या तिन्ही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page