कुंदनसह रंगीत खडे बसविण्यासाठी दिलेल्या दागिन्यांचा अपहार
1.87 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2025
मुंबई, – कुंदनसह रंगीत खडे बसविण्यासाठी दिलेल्या 1 कोटी 87 लाख रुपयांचा सोन्याचा दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एका कुटुंबातील चार ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रतनलाल सेहगल, अमीत सेहगल, दिशा सेहगल आणि राकेश राणी सेहगल अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांनी मुंबईसह दिल्लीत अनेकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या अटकेसाठी मुंबईसह दिल्ली पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
संजय राखाहरी रॉय हे ज्वेलर्स व्यापारी असून भाईंदर परिसरात राहतात. त्यांचा झव्हेरी बाजार येथील धनजी स्ट्रिट परिसरात आर. के आर ज्वेलर्स नावाचे ज्वेलर्स शॉप आहे. याच शॉपमधून ते सोन्याचे दागिने, देवी-देवतांच्या मूर्त्यांचे लॉकेट तयार करुन त्याची होलसेलमध्ये विक्री करतात. त्यांच्याकडे एकूण 25 कारागिर आहेत. त्यांच्या दागिन्यांना मुंबईसह पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश राज्यातील व्यापार्याकडून मोठ्या प्रमाणात मागणी होते. त्यासाठी त्यांनी दिल्लीतील करोल बाग परिसरात एक कार्यालय सुरु केले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांची एम. एस रतनलाल डायमंड ज्वेलर्सचे मालक रतनलाल सेहगल यांच्याशी ओळख झाली होती. त्यांच्यासोबत त्यांचे इतर तीन नातेवाईक भागीदार आहेत. त्यांचा सोन्याचे दागिने बनविणे, कुंदनसह रंगीत खडे बसविण्याचा एक कारखाना आहे. त्यामुळे त्यांनी त्यांना अनेकदा कुंदनसह रंगीत खडे बसविण्यासाठी सोन्याचे दागिने दिले होते, ते काम झाल्यानंतर त्यांनी ते दागिने त्यांना परत केले होते. त्यामुळे त्यांच्यावर त्यांचा विश्वास होता.
एप्रिल 2024 रोजी त्यांनी त्यांना 1 कोटी 87 लाख 89 हजार 807 रुपयांचे 2582 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कुंदन आणि रंगीत खडे बसविण्यासाठी दिले होते. पंधरा दिवसांत दागिने देतो असे सांगूनही त्यांनी ते दागिने दिले नव्हते. कॉल केल्यानंतर चारही आरोपी वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे ते स्वत दिल्लीतील त्यांच्या शॉपसह कारखान्यात गेले होते. यावेळी त्यांना तिथे लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली. चौकशीदरम्यान रतनलाल, अमीत, दिशा आणि राकेश हे चौघेही अनेकांकडून सोन्याचे दागिने घेऊन दुकान बंद करुन पळून गेल्याचे समजले. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना धक्काच बसला होत. त्यानंतर ते मुंबईत आले होते. काही महिने त्यांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
कुंदन आणि रंगीत खडे बसविण्यासाठी घेतलेल्या 1 कोटी 87 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन या चौघांनी त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सेहगल कुटुंबियांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रतनलाल सेहगल, अमीत सेहगल, दिशा सेहगल आणि राकेश सेहगल या चौघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.