दोन घटनेत 52.60 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
दोन कर्मचार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 फेब्रुवारी 2025
मुंबई, – झव्हेरी बाजार आणि भुलेश्वर येथील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन कर्मचार्यांनी 52 लाख 60 हजार रुपयांच्या 811 ग्रॅम वजनाच्या सोन्यांच्या दागिन्यांचा अपहार करुन दोन ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या कर्मचार्यांचा शोध सुरु आहे. सुजीतकुमार हनुमान प्रसाद व आणि देवरंजन दुलाई अशी या दोघांची नावे असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची टिम लवकरच उत्तरप्रदेश आणि कोलकाता येथे जाणार आहे.
राजकपूर लालताप्रसाद गुप्ता हे ज्वेलर्स व्यापारी असून ते लोअर परेल येथे राहतात. त्यांचा भुलेश्वर येथील नेमिनाथ टॉवरमध्ये आर के ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. याच शॉपमध्ये सुजीतकुमार हा कामाला होता. त्याच्यावर सोन्याचे दागिने विक्रीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 2 जून ते 19 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राजकूपर यांनी सुजीतकुमार 604 ग्रॅम वजनाचे 37 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले होते. मात्र विक्री केलेल्या दागिन्यांचे पेमेंट कार्यालयात जमा न करता त्याने या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केल होती. याबाबत त्याला विचारणा केल्यानंतर त्याने लवकरच पेमेंट जमा करण्याचे आश्वासन दिले, मात्र दागिने किंवा पेमेंट जमा केले नव्हते. काही दिवसांनी सुजीतकुमार हा पळून गेला होता. त्याने त्याचा मोबाईल बंद ठेवला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत सुजीतकुमारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन मालकाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार अविजीत तपन कुमार हे सोने कारागिर असून ते झव्हेरी बाजार येथे राहतात. तिथे त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना असून तिथे देवरंजन हा कारागिर म्हणून कामाला होता. जानेवारी महिन्यांत त्यांनी देवरंजनला पंधरा लाख दहा हजार रुपयांचे शुद्ध सोने मंगळसूत्र पेंडल बनविण्यासाठी दिले होते. मात्र ते दागिने न बनविता देवरंजन हा शुद्ध सोने घेऊन पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. देवरंजन हा कोलकाता तर सुजीतकुमार मूळचा उत्तरप्रदेशच्या जौनपूरचा रहिवाशी आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी एक टिम लवकरच उत्तरप्रदेश व कोलकाता येथे जाणार आहे.