स्वस्तात सोने देण्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणुक
सव्वाकोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मार्च 2025
मुंबई, – एक्साईज आणि पोलीस अधिकार्याच्या मदतीने जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याची बतावणी करुन एका व्यावसायिकाची तीनजणांच्या टोळीने सुमारे सव्वाकोटीची फसवणुक केली. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध पायधुनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आशिष सुरेश गोयके, अनिल बागुल आणि अनिकेत अशी या तिघांची नावे आहेत. या कटाचा आशिष मुख्य आरोपी असून त्याने अनिल हा एक्साईज आणि अनिकेत पोलीस अधिक्षक असल्याचे सांगून ही फसवणुक केली आहे. या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वकास अब्दुल हमीद शेख हे व्यावसायिक असून ते ठाण्यातील रहिवाशी आहेत. जानेवारी महिन्यांत त्यांची आशिष गोयके याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याने त्याचा सोने विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या मार्केटमध्ये सोन्याचा 60 हजार प्रती दहा ग्रॅमचा भाव आहे. तेच सोने त्यांना 52 हजारामध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यात त्यांनी गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले होते. त्याची ही ऑफर चांगली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडून सोने घेण्याची तयारी दर्शवून त्याच्याकडे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
याच दरम्यान आशिषने त्यांची ओळख अनिल बागुल आणि अनिकेत या दोन व्यक्तींशी करुन दिली होती. अनिल हा एक्साईज अधिकारी तर अनिकेत हा वाशिंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे पोलीस अधिक्षक असल्याचे सांगितले होते. त्यांनी जप्त केलेले सोने सोडवून त्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना सव्वाकोटी रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना सोने दिले नाही किंवा सोन्यासाठी घेतलेले सव्वाकोटी रुपये परत केले नाही. वारंवार विचारणा करुनही या तिघांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिघांविरुद्ध पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तिघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.