सव्वाकोटीचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिराचे पलायन
अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून दोघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 मार्च 2025
मुंबई, – दुरुस्तीसाठी दिलेल्या सुमारे सव्वाकोटीचे सोन्याचे दागिने घेऊन दोन कारागिराने पलायन केल्याची घटना झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरुण जाना आणि श्रीकांत या दोन्ही कारागिराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही व्यापार्याच्या दागिन्यांचा अपहार केला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
निलेश चंपाला जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते काळाचौकी परिसरात राहतात. त्यांचा झव्हेरी बाजार येथील उस्ताद इमारतीच्या दुसर्या मजल्यावर सोन्याचे दागिने होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय आहे. वरुण जाना आणि श्रीकांत हे दोघेही त्यांच्या परिचित कारागिर असून त्यांच्याकडून ते अनेकदा सोन्याचे दागिने बनवून घेत होते. 1 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत त्यांनी या दोघांना 22 कॅरेटचे 1536 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी दिले होते. त्याची किंमत सुमारे सव्वाकोटी रुपये इतकी आहेत. मात्र दागिने दुरुस्तीचे काम पूर्ण न करता ते दोघेही दागिने घेऊन पळून गेले होते. हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे त्यांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही किंवा त्यांनी त्यांच्या कॉलला प्रतिसाद दिला नव्हता.
या दोघांनी नंतर त्यांचे कॉल बंद केले होते. ते दोघेही सव्वाकोटीचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वरुण जाना आणि श्रीकांत यांच्याविरुद्ध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांच्या अटकेसाठी दोन टिम मुंबईबाहेर पाठविण्यात आले असून या दोघांनाही लवकरच दागिन्यांसह अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.