दागिने बनविण्यासाठी दिलेले 2.14 कोटीचे सोने घेऊन पलायन
पळून गेलेल्या कारागिराविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मार्च 2025
मुंबई, – सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले दोन कोटी चौदा लाखांचे शुद्ध सोने घेऊन प्रसन्नजीत शितला सामंता नावाच्या एका कारागिराने पलायन केल्याची घटना काळबादेवी परिसरात घडली. याप्रकरणी प्रसन्नजीतविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. तो त्याच्या गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने एक टिम लवकरच त्याच्या गावी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
60 वर्षांचे वयोवृद्ध राजेश ललितचंद्र शाह हे ज्वेलर्स व्यापारी असून ते दादर परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची आर. पी ज्वेल्स इंम्पेक्स नावाची सोन्याचे दागिने खरेदी-विक्री करणारी एक कंपनी आहे. या कंपनीचे शॉपसह कार्यालय काळबादेवी येथील काकड मार्केट परिसरात आहे. प्रसन्नजीत हा त्यांचा परिचित कारागिर असून ते अनेकदा त्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते. दागिने बनवून दिल्यानंतर ते त्याला त्याची मजुरी किंवा सोने देत होते. सुरुवातीला शुद्ध सोने दिल्यानंतर त्याने सोन्याचे दागिने बनवून त्यांचा विश्वास संपादन केला होता.
गेल्या वर्षी त्यांना सोन्याच्या दागिन्यांची मोठी ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे त्यांनी त्याला ऑगस्ट 2024 रोजी 1 कोटी 37 लाख रुपयांचे 1720 ग्रॅम शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी तसेच 1055 ग्रॅम वजनाचे 77 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी दिले होते. अशा प्रकारे त्यांनी 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्टला त्याला 2 कोटी 14 लाखांचे शुद्ध सोन्यासह दागिने विश्वासाने दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दागिने बनवून न देता कारखान्यातून पलायन केले होते. राजेश शाहने त्यांना कॉल केल्यानंतर त्याने त्यांना प्रतिसाद दिला नव्हता. नंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे ते स्वत त्याच्या कारखान्यात गेले होते. यावेळी त्यांना प्रसन्नजीत हा शुद्ध सोन्यासह दागिने घेऊन पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रसन्नजीतविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध शुद्ध सोन्यासह दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.