विक्रीसाठी दिलेले सोन्याचे दागिने घेऊन नोकराचे पलायन
70 लाखांच्या दागिन्यांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 एप्रिल 2025
मुंबई, – जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत परिचित ज्वेलर्स व्यापार्यांना विक्रीसाठी दिलेले सुमारे 70 लाख रुपयांचे 902 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन नोकराने पलायन केल्याची घटना झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रमोदकुमार बस्तीमलजी परमार या नोकराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
मेहुल कवर्षांल जैन हे व्यवसायाने ज्वेलर्स व्यापारी असून झव्हेरी बाजार परिसरात राहतात. याच ठिकाणी त्यांच्या मालकीचे ज्वेलरी शॉप आहे. त्यांच्याकडे प्रमोदकुमार हा कामाला असून तो विविध ज्वेलर्स व्यापार्यांना सोन्याचे दागिने विक्रीचे काम करतो. या कामात तो प्रचंड हुशार असल्याने त्यांचा प्रमोदकुमारवर विश्वास होता.
जानेवारी आणि फेबुवारी 2025 रोजी त्यांनी प्रमोदला 22 कॅरेटचे 1946 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याच्या परिचित ज्वेलर्स व्यापार्यांना विक्रीसाठी दिले होते. त्यापैकी त्याने विक्री न झालेले 1404 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मेहुल जैन यांना परत केले होते. उर्वरित सोन्याचे दागिन्यांची विक्री झाली असून त्याचे पेमेंट लवकरच जमा करतो असे सांगितले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने सोन्याचे दागिने किंवा दागिन्यांच्या विक्रीतून आलेले पेमेंट जमा केले नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांना प्रमोदकुमारकडून प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद करुन पलायन केले होते. 902 ग्रॅम वजनाचे सुमारे सत्तर लाखांचे सोन्याचे दागिन्यांचा परस्पर अपहार करुन त्याने मेहुल जैन यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्यांचा नोकर प्रमोदकुमार परमार याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रमोदकुमार हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.