शुद्ध सोन्यासाठी घेतलेल्या 25 कोटीचा अपहार करुन फसवणुक
फसवणुकीप्रकरणी सोन्याच्या व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मे 2025
मुंबई, – शुद्ध सोन्यासाठी घेतलेल्या सुमारे 25 कोटीचा अपहार करुन एका सोन्याच्या व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी रौनककुमार जसराज पलगोटा या व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रौनककुमार हा सोन्याचा बुलियन व्यापारी असून त्याच्या मालकीची राज बुलियन नावाची झव्हेरी बाजार परिसरात एक खाजगी कंपनी आहे. फसवणुकीनंतर रौनककुमार हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याने अशाच प्रकारे मार्केटमधील काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
मांगीलाल धरमचंद्र कोठारी हे सोन्याचे बुलियन व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत पवईतील आआयटी मेन गेट, सोलोमन जी. एल कंपाऊंडमध्ये राहतात. त्यांचा शुद्ध सोने होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय असून त्यांचे पवईतील हिरानंदानी गार्डन, गेलेरिया शॉपिंग मॉलमध्ये मॅजिक गोल्ड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्यांनी रौनककुमार पलगोटा यांच्याशी ओळख झाली होती. ते स्वत सोन्याचे बुलियन व्यापारी असून त्यांचा झव्हेरी बाजार येथे शुद्ध सोने विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शुद्ध सोने असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्यासोबत व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्यांना स्वस्तात शुद्ध सोने देण्याची तयारी दर्शविली होती.
त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना 26 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 जुलै या कालावधीत 37 किलो शुद्ध सोन्यासाठी टप्याटप्याने 25 कोटी 87 लाख 69 हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना शुद्ध सोन्याची डिलीव्हरी केली नाही. वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. 37 लाखांचे शुद्ध सोने न देता रौनककुमारने शुद्ध सोन्यासाठी घेतलेल्या 25 कोटी 87 लाख 69 हजार रुपयांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी किल्ला कोर्टात त्याच्याविरुद्ध एक याचिका दाखल करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी देताना कोर्टाने एल. टी मार्ग पोलिसांना रौनककुमारविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर राज बुलियनचे मालक रौनककुमार पलगोटा याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या आरोपी व्यापार्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.