खरेदी केलेल्या सोन्याचा दागिन्यांचा पेमेंट न करता अपहार
1.67 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मे 2025
मुंबई, – खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार मुंबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. लेन्चु के जेम्स असे या आरोपी ज्वेलर्स व्यापार्याचे नाव असून त्याच्यावर 1 कोटी 67 लाखांच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे.
66 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार संपतराज हेमचंद्र जैन हे भायखळा परिसरात राहतात. त्यांचा मुंबादेवी मंदिराजवळ एमएम करबावला अॅण्ड कंपनी नावाचे ज्वेलर्स शॉप आहे. त्यांचा होलसेलमध्ये सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. लेन्चु जेम्स हा त्यांचा परिचित ज्वेलर्स व्यापारी असून तो मूळचा केरळच्या कोटययमचा रहिवाशी आहे. त्याची केरळमध्ये लाना गोल्ड अॅण्ड डायमंड नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. फेब्रुवारी महिन्यांत तो त्यांच्या ज्वेलर्स शॉपमध्ये आला होता. त्याने त्यांच्याकडून 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विविध 22 कॅरेटचे 1 कोटी 67 लाखांचे 2078 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले होते.
या दागिन्यांचे पेमेंट काही दिवसांत करतो असे सांगून तो केरळला निघून गेला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने खरेदी केलेल्या दागिन्यांचे पेमेंट केले नाही किंवा त्यांना परत दागिने आणून नव्हते. विचारणा केल्यानंतर त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. खरेदीच्या नावाने सोन्याचे विविध दागिने घेऊन दागिन्यांचे पेमेंट न करता त्याने त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी लेन्चु जेम्स याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी ज्वेलर्स व्यापार्याच्या अटकेसाठी एल. टी मार्ग पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच केरळला जाणार आहे.