दागिने बनविण्यासाठी दिलेल्या 69 लाखांच्या शुद्ध सोन्यांचा अपहार

ज्वेलर्स व्यापार्‍यासह दोन कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 जून 2025
मुंबई, – सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे 69 लाखांच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन तीन व्यापार्‍यांची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार आणि गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एल. टी मार्ग आणि व्ही पी रोड पोलिसांनी तीन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. अमीतकुमार बन्सारी मोंडल, बाळकृष्ण तुकाराम मांजरेकर आणि सुकांतो शिवांता घोष अशी या तिघांची नावे असून यातील अमीतकुमार ज्वेलर्स व्यापारी आहे तर बाळकृष्ण आणि सुकांतो हे दोघेही कारागिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते तिघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

हस्तीमल दिपचद जैन हे 60 वर्षांचे वयोवद्ध ज्चेलर्स व्यापारी असून ते घाटकोपर परिसरात राहतात. त्यांचा झव्हेरी बाजार येथे होलसेलमध्ये सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. बाळकृष्ण तुकाराम मांजरेकर हा त्यांच्या परिचित कारागिर असून अनेकदा ते त्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते. एप्रिल महिन्यांत त्यांनी बाळकृष्ण याला 17 लाख 68 हजार रुपयांचे 180 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने सोन्याचे मंगळसूत्र बनविण्यासाठी दिले होते. दहा ते पंधरा दिवसांत मंगळसूत्र बनवून देतो असे सांगून बाळकृष्णं शुद्ध सोने घेऊन गेला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने सोन्याचे मंगळसूत्र बनवून दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना बाळकृष्ण हा पळून गेल्याचे समजले होते. त्याचा मोबाईल बंद येत होता. सोन्याचे मंगळसूत्र बनविण्यासाठी दिलेले 17 लाख 69 हजार रुपयांचे शुद्ध सोने घेऊन बाळकृष्ण पळून गेल्याने त्यांनी त्याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

अशी दुसरी घटना झव्हेरी बाजार परिसरात घडली. नितीन बाबूलाल जैन यांचा ज्वेलरी बनविण्याचा व्यवसाय असून त्यांचा कारखाना पहिली अग्यारी लेन परिसरात आहे. याच कारखान्यात सुकांतो हा कारागिर म्हणून काम करतो. फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत त्यांनी सुकांतो याला सुमारे 25 लाखांचे शुद्ध सोने 22 मंगळसूत्र बनविण्यासाठी दिले होते. मात्र त्याने मंगळसूत्र न बनविता या शुद्ध सोन्याचा अपहार करुन कारखान्यातून पलायन केले होते. हा प्रकार नंतर तक्रारदाराच्या लक्षात येताच त्यांनी त्याला कॉल केला होता, मात्र त्याचा कॉल बंद येत होता. तो त्याच्या ठाण्यातून घरातून पळून गेला होता. या दोन्ही घटनेनंतर बाळकृष्ण आणि सुकांतो यांच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती.

तिसरी घटना गिरगाव येथील तिसरी भोईवाडा, काका कुआ इमारतीमध्ये घडली. कांदिवली परिसरात राहणारे पोलाष कार्तिक मोंडल हे ज्वेलर्स व्यापारी आहे. त्यांचा अमीतकुमार हा परिचित व्यापारी आहे. फेब्रुवारी महिन्यांत त्यांनी अमीतकुमार याला साडेचोवीस लाखांचे 350 शुद्ध सोने सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिले होते. मात्र जून महिना उलटूनही त्याने त्याने सोन्याचे दागिने बनविले नाही. शुद्ध सोने घेऊन तो पळून गेला होता. त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. फसवणुकीचा हा प्रकार त्यांनी व्ही. पी रोड पोलिसां तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अमीतकुमारविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page