साडेतीन कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
व्यापार्याच्या सेल्समन कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 जुलै 2025
मुंबई, – जयपूर शहरातील विविध ज्वेलर्स व्यापार्यांना विक्रीसाठी दिलेल्या सुमारे साडेतीन कोटीच्या 3640 ग्रॅम वजनाच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा व्यापार्याच्या सेल्समन कर्मचार्यानेच अपहार करुन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लतेश पिसुलाल जैन या सेल्समन कर्मचार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या लतेश जैनचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
आयुष जितेश जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत काळाचौकी परिसरात राहतात. त्यांचा काळबादेवी येथील जोहर पॅलेसमध्ये शकुन ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. त्यांच्याकडे लतेश जैन हा सेल्समन म्हणून कामाला आहेत. ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने विविध ज्वेलर्स व्यापार्यांना दाखवून त्यांच्याशी खरेदी-विक्री करणे, विक्रीतून आलेले पेमेंट जमा करणे आदी कामाची जबाबदारी त्याच्यावर होती. अनेकदा लतेश हा मुंबईसह देशभरातील विविध शहरात जाऊन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी-विक्री करत होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता.
1 जुलै ते 21 जुलै 2025 रोजी त्यांनी त्याला सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे 22 कॅरेटचे 3640 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जयपूर येथील आयुष जैन यांच्या परिचित ज्वेलर्स व्यापार्यांना दाखविण्यासाठी दिले होते. ठरल्याप्रमाणे तो सोन्याचे दागिने घेऊन जयपूरला गेला होता. मात्र दिलेल्या मुदतीत तो सोन्याचे दागिने विक्री करुन दुकानात आला नव्हता. त्याला संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. जयपूरच्या काही ज्वेलर्स व्यापार्यांना संपर्क साधल्यानंतर तिथे लतेश जैन हा दागिने घेऊन आला नसल्याचे आयुष जैन यांना समजले होते.
विक्रीसाठी दिलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा लतेश जैन यांनी अपहार करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच आयुष जैन यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगून लतेश जैनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लतेश हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.