2.88 कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
पळून गेलेल्या दोन्ही कारागिराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑगस्ट 2025
मुंबई, – विश्वासाने दिलेल्या 2 कोटी 88 लाख रुपयांचे सोन्याचे दागिन्यांचा अपहार करुन दोन ज्वेलर्स व्यापार्यांची त्यांच्याच कारागिराने फसवणुक केल्याची घटना काळबादेवी आणि शेख मेनन स्ट्रिट परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही कारागिराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. आमिरुल नास्कर मलिक आणि मानस मोहन मंड अशी या दोन्ही कारागिराचे नाव असून पळून गेलेल्या या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अभिषेक अशोककुमार जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चेंबूर येथील सायन-ट्रॉम्बे रोड, सनी इस्टेट अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा शेख मेनन स्ट्रिट परिसरात एम. एम ज्वेल्स नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. मानस मंड हा त्यांचा कारागिर असून त्याच्याकडून त्यांनी अनेकदा शुद्ध सोने देऊन सोन्याचे दागिने बनवून घेतले होते. त्यामुळे त्यांचा मानसवर प्रचंड विश्वास होता. एप्रिल आणि मे 2025 रोजी त्यांनी त्याला 2510 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यसाठी दिले होते. तयापूर्वी त्यांनी त्याला 178 ग्रॅम वजनाचे सोने दिले होते. मात्र 2 कोटी 66 लाख रुपयांचे 2689 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने परत न करता मानस हा पळून गेला होता. मानस अचानक कामावर येणे बंद झाल्याने त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. 2 कोटी 66 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन मानस हा पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
ही घटना ताजी असताना अशीच दुसरी घटना काळबादेवी परिसरात घडली. सुशांत प्रशांत मैती हे सोने कारागिर असून त्यांचा काळबादेवी परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे आमिरुल मलिक हा कारागिर म्हणून कामाला होता. मार्च महिन्यांत त्यांनी त्याला 22 लाख रुपयांचे 350 ग्रॅम सोन्याचे दागिने मीणाचे काम दिले होते. मात्र तो दागिने घेऊन पळून गेला होता. हा प्रकार अलीकडेच त्यांच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे त्यांनी आमिरुल मलिकविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मानस मंड आणि आमिरुल मलिक या दोन्ही कारागिराविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी एल. टी मार्ग पोलिसांचे विशेष पथक त्यांच्या गावी जाणार असल्याचे सांगण्यात आले.