1.86 कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक

दोन व्यापार्‍याना गंडा घालणार्‍या पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
मुंबई, – विक्रीसाठी 1 कोटी 86 लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने घेऊन दागिन्यांचे पेमेंट न करता दोन ज्वेलर्स व्यापार्‍याची पिता-पूत्र व्यापार्‍यांनीच फसवणुक केल्याचा प्रकार पायधुनी परिसरात उघडकीस आला आहे. रणजीत जैन आणि शुभम रणजीत जैन अशी या पिता-पूत्रांची नावे असून ते दोघेही आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम परिसरातील संघवी ज्वेलर्सचे मालक आहेत. या दोघांविरुद्ध पायधुनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा अटकेसाठी एक टिम लवकरच आंधप्रदेशला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राकेश ललितकुमार जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते लोअर परेल परिसरात राहतात. त्यांचा मुंबादेवी येथील तांबाकाटा लेन, ज्वेल क्राऊन इमारतीमध्ये एक कार्यालय आहे. याच कार्यालयातून त्यांचा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालतो. रणजीत जैन आणि त्यांचा मुलगा शुभम हे त्यांच्या परिचित व्यापारी आहेत. या दोघांचा विशाखापट्टणम येथे संघवी ज्वेलर्स मॉल नावाचे एक शॉप आहे.

एप्रिल ते मे 2025 या कालावधीत या पिता-पूत्रांनी राकेश जैन यांच्याकडून सव्वाकोटी तर त्यांच्या परिचित ज्वेलर्स व्यापारी प्रफुल्ल पन्नालाल राणावात यांच्याकडून 61 लाख 78 हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने विक्रीसाठी घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांच्या दागिन्यांचे पेमेंट केले नाही.

कॉल, व्हॉटअप आणि मॅसेजद्वारे वारंवार संपर्क साधूनही त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नव्हता. नंतर त्यांनी त्याचें मोबाईल बंद केले होते. विक्रीसाठ घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा पेमेंटचा अपहार करुन जैन पिता-पूत्रांनी राकेश जैन आणि प्रफुल्ल राणावत यांची फसवणुक केली होती.

या दागिन्यांची परस्पर विक्री करुन पैशांचा अपहार केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पायधुनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या पिता-पूत्रांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रणजीत जैन आणि शुभम जैन या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page