दोन वेगवेगळ्या घटनेत पावणेदोन कोटीच्या सोन्याचा अपहार

मशिदबंदर व गिरगावातील घटना; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 जानेवारी 2026
मुंबई, – दोन वेगवेगळ्या घटनेत चारजणांच्या टोळीने सुमारे पावणेदोन कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन दोन व्यापार्‍यांची फसवणुक केल्याची घटना मशिदबंदर आणि गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध व्ही. पी रोड आणि पायधुनी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. राजू बबलू दलबेरा, चंदू कृष्णा राय, मोहित राघवेंद्र वर्मा आणि रमेश शांतीलाल ऊर्फ शंकरा राम अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आकाश अशोक सुराणा हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत फोर्ट परिसरात राहतात. त्यांचा काळबादेवी, झव्हेरी बाजार परिसरात सियारा ज्वेल्स नावाचे सोन्याचे शॉप आहे. त्यांच्याकडे मुंबईसह इतर शहरातील ज्वेलर्स व्यापारी सोन्याचे दागिने खरेदी करतात. डिसेंबर महिन्यांत त्यांच्या शॉपमध्ये मोहीत आला होता. त्याने आकाश यांच्याशी ओळख निर्माण करुन त्यांच्याकडे तेरा लाखांचे सोन्याचे दागिने घेतले होते. 17 डिसेंबरला तो पुन्हा त्यांच्या शॉपमघ्ये आला होता. त्याने त्यांना 1517 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेटचे ऑर्डर दिली होती. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांच्याकडे तीस लाखांची कॅश सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा केली होती.

ब्रेसलेटच्या डिलीव्हरीनंतर उर्वरित दिड कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. मोहितने त्यांच्याकडून याआधीही सोन्याचे दागिने खरेदी केले होते, त्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याने दिलेल्या गिरगाव येथील पत्त्यावर सोन्याच्या ब्रेसलेटची डिलीव्हरीसाठी दोन कर्मचार्‍यांना पाठविले होते. यावेळी तिथे गेल्यानंतर मोहित नव्हता. त्यांचा नोकर रमेश शांतीलालसह अन्य एक तरुण होता. या दोघांनी आतमध्ये इंदौरमधील काही ज्वेलर्स बसले आहेत, त्यामुळे त्यांनी आणलेले सोन्याचे ब्रेसलेट त्यांना दाखविण्यासाठी घेऊन जातो असे सांगून ते दोघेही त्यांच्याकडील दिड किलो सोन्याचे ब्रेसलेट घेऊन आतमध्ये गेले.

त्यानंतर मोहितसह रमेश हे दोघेही दिड कोटीचे दिड किलो सोन्याचे ब्रेसलेट घेऊन तेथून पळून गेले होते. त्यांनी त्यांना कॉल केल्यानंतर मोहितने त्यांना गिरगाव येथे बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर त्याने त्यांना पेमेंट करण्याचे आश्वासन देत पोलिसांत तक्रार करु नका असा सल्ला दिला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. त्यांच्याकडे दिड कोटीचे पेेमेंट न आल्याने आकाश सुराणा यांनी घडलेला प्रकार व्ही. पी रोड पोलिसांना सांगून तिथे आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहीत वर्मा आणि रमेश शांतीलाल या दोघांविरुद्ध पोलिसांनी सोन्याच्या ब्रेसलेटचा अपहार करुन त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

दुसर्‍या घटनेत राजू बबलू बदबेरा आणि चंदू कृष्णा राय या दोघांविरुद्ध पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुब्रतो भूतनाथ पाल हे सोने कारागिर असून ते दिवा परिसरात राहतात. मशिदबंदर परिसरात त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. याच कारखान्यात राजू आणि चंदू हे दोघेही कारागिर म्हणून कामाला होते. नोव्हेंबर 2025 रोजी त्यांना 212 ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. मात्र ते दोघेही दागिने न बनविता सोने घेऊन पळून गेले होते. हा प्रकार सुब्रतो पाल यांच्या लक्षात येताच त्यांनी पायधुनी पोलिसांत राजू आणि चंदू यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्घ पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page