कर्नाटकच्या मंत्र्याच्या नावाने घेतलेल्या दागिन्यांचा अपहार

व्यावसायिक मित्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 फेब्रुवारी 2026
मुंबई, – कर्नाटकच्या मंत्र्याच्या नावाने घेतलेल्या सुमारे अकरा लाख रुपयांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्‍याची फसवणुक झाल्याचा प्रकार वाळकेश्वर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैभव परेश ठक्कर या 35 वर्षांच्या व्यावसायिक मित्राविरुद्ध गावदेवी पोलिसांनी अपाहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वैभव हा फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्याने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हेमांग मुकेश शहा हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचा सोने-चांदीचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वाळकेश्वर परिसरात राहत असून त्यांची सुपर कॅरेट्स जेम आर्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी आहे. गेल्या दोन वर्षांपासून वैभव ठक्कर हा त्यांच्या परिचित असून त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्याकडून त्याने अनेकदा सोन्याचे दागिने घेतले होते, त्याचे पेमेंट वेळेवर दिल्याने त्यांना त्याच्यावर विश्वास होता. काही महिन्यांपूर्वीच तो त्यांच्याकडे आला होता. त्याने त्यांना कनार्टकमध्ये एक मंत्री असून त्यांना विविध डिझाईनचे मौल्यवान सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहे. त्यासाठी त्याने त्यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती.

खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यास पेमेंट देण्याचे किंवा सोन्याचे दागिने परत करण्याचे त्याने त्यांना आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून सुमारे अकरा लाख रुपयांचे विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने दिले होते. एका आठवड्यात व्यवहार पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन तो हिरेजडीत दागिने घेऊन निघून गेला. एक आठवड्यानंतर त्यांनी त्याला फोन केला असता त्याने दागिन्यांची विक्री झाली असून लवकरच त्यांचे पेमेंट करतो असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दागिन्यांचे पेमेंट केले नाही किंवा दागिने परत आणून दिले नाही. वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर त्याने त्यांचा कॉल ब्लॉक केला होता.

चौकशीदरम्यान त्यांना वैभव ठक्कर हा सराईत गुन्हेगार असून त्याने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्‍यांची फसवणुक केल्याचे समजले होते. कर्नाटकच्या मंत्र्याच्या नावाने त्याने त्यांच्याकडून घेतलेल्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी गावदेवी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून वैभव ठक्कर याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page