बंगलोर ज्वेलर्स व्यापार्यांना विक्रीसाठी दिलेल्या सोन्याचा अपहार
2.70 कोटीच्या अपहारप्रकरणी सेल्समनविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बंगलोर येथील ज्वेलर्स व्यापार्यांना विक्रीसाठी दिलेल्या 2 कोटी 70 लाख रुपयांच्या 1668 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह शुद्ध सोन्याचा शॉपच्या सेल्समनने अपहार केल्याची घटना काळबादेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी संजय जैन या सेल्समनविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शॉपच्या सेल्समनने दागिन्यांचा अपहार केल्याने काळबादेवीतील ज्वेलर्स व्यापार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
धीरजकुमार रतनचंद जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते लालबाग, चिवडा गल्लीतील विजया रेसीडन्सीमध्ये राहतात. त्यांचा काळबादेवी येथील हिंदूस्तान चेंबर, विठ्ठल सदन मारतीमध्ये भूमी गोल्ड नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. याच शॉपमध्ये ते त्यांच्या भावासोबत सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. ते दोघेही बंधू त्यांच्याकडील कारागिराकडून विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने बनवून त्यासचची छत्तीसगढ, बंगलोरसह इतर शहरात विविध ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री करतात. या दागिन्यांच्या मोबदल्यात काही ज्वेलर्स व्यापारी त्यांना शुद्ध सोने देतात तर काही व्यापारी दागिन्यांचे पेमेंट करतात.
याच कामासाठी त्यांनी संजय जैन आणि हितेंद्र चौहाण यांची सेल्समन म्हणून नियुक्ती केली होती. 7 जानेवारी 2026 रोजी त्यांनी संजय जैन याला बंगलोर येथील व्यापार्यांना विक्रीसाठी 1180 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने दिले होते. ठरल्याप्रमाणे संजय जैन दागिन्यांची विक्री करुन सात दिवसांत मुंबईत परत येणार होता. मात्र सात दिवस उलटूनही तो परत आला नाही. त्याने त्यांना आणखीन काही दिवस तिथे राहावे लागेल असे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र पंधरा दिवस उलटूनही तो दुकानात आला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी बंगलोर येथील संबंधित ज्वेलर्स व्यापार्याकडे संजय जैनविषयी चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान त्यांना संजय जैन हा त्यांच्या दुकानात आला होता. सोन्याच्या दागिन्यांची विक्री करुन तो शुद्ध सोने घेऊन निघून गेल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. काही दिवसांनी त्याने त्यांचा क्रमांक ब्लॉक केला होता. संजयने दागिन्यांच्या विक्रीतून शुद्ध सोने घेतले होते.
त्याच्याकडून सातशे ग्रॅम शुद्ध सोने येणे बाकी होते. मात्र त्याने दिलेल्या मुदतीत 2 कोटी 70 लाख रुपयांचे 1668 ग्रॅम सोने दुकानात जमा केले नाही. तो शुद्ध सोने घेऊन पळून गेल्याची खात्री होताच धीरजकुमार जैन यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगून संजय जैनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.