८१ लाखांच्या दागिन्यांचा अपहार करुन व्यापार्याची फसवणुक
प्रभादेवीच्या चिंतामणी ज्वेलर्सच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ जुलै २०२४
मुंबई, – सुमारे ६४ लाखांचे आगाऊ पेमेंट देऊन दिड कोटी रुपयांचे विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने घेऊन उर्वरित ८१ लाखांच्या पेमेंटचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यापार्याच्या तक्रारीवरुन एल. टी मार्ग पोलिसांनी प्रभादेवी येथील चिंतामणी ज्वेलर्सचे मालक चिंतामणी अरुण कायगांवकर यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत लवकरच चिंतामणीची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
प्रमोद सुरेंद्रकुमार मेहता हे ज्वेलर्स व्यापारी असून ते घाटकोपरच्या एम. जी रोड, कैलास अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे काळबादेवी परिसरात शाईन शिल्पी ज्वेलर्स नावाचे एक दुकान असून गेल्या अकरा वर्षांपासून ते होलसेलमध्ये सोन्याचे दागिन्यांची विक्री करतात. त्यांचे परिचित व्यापारी सतीश टकले यांनी त्यांची ओळख चिंतामणी कायगांवकर याच्याशी करुन दिली होती. तो सोन्याचा व्यापारी असून त्याचा प्रभादेवी येथे चिंतामणी ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. चिंतामणी हा सतीश टकले यांचा नातेवाईक असल्याने त्यांनी त्याच्यासोबत व्यवहार सुरु केला होता. २४ ऑक्टोंबर २०२० रोजी त्याने त्यांना व्हॉटअप कॉल करुन त्यांच्याकडे दिड कोटीचे तीन किलो वजनाचे लहान-मोठे नेकलेस, बांगड्या, कानातील टॉप्स, लटकन, अंगठ्या, कानासह गळ्यातील चैन, मंगळसूत्र व ब्रेसलेट आदी सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर दिली होती. ऑर्डर मोठी होती, त्यामुळे त्यांनी त्यांना आधी आगाऊ पेमेंट देण्यास सांगितले होते. त्यामुळे त्याने त्यांना आधी पाच लाख रुपये आणि नंतर ६४ लाख ६४ हजार रुपयांचे आगाऊ पेमेंट पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.
ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला २०२१ ते २०२२ या कालावधीत सुमारे दिड कोटी रुपयांचे तीन किलो वजनाचे विविध सोन्याचे दागिने दिले होते. यावेळी त्याने त्यांना उर्वरित रक्कम तीस दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही त्याने १५८७ ग्रॅम वजनाचे ८१ लाख ५१ हजार ६३१ रुपयांचे पेमेंट केले नव्हते. त्यामुळे ते त्यांच्या दुकानात गेले होते, मात्र त्यांची चिंतामणीशी भेट झाली नाही. कॉल केल्यानंतर त्याने त्यांच्याकडे आणखीन काही दिवसांची मुदत मागून घेतली होती. दिड वर्षांपासून तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. ६४ लाख ६४ हजार रुपयांचे आगाऊ पेमेंट करुन त्याने त्यांच्याकडून दिड कोटीचे दागिने घेतले, मात्र वारंवार विचारणा करुन उर्वरित पेमेंट केले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी चिंतामणी कायगांवकर याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप चिंतामणीला अटक झाली नाही. लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीत त्याने प्रमोद मेहता यांच्यासह इतर काही व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.