सव्वाकोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
जयपूर शहरातील दोन ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ जुलै २०२४
मुंबई, – सुमारे सव्वाकोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार ऑपेराहाऊस परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांनी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पंकजकुमार दयाराम खिंची आणि सुशील ओमप्रकाश पारीख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवाशी आहेत. या दोघांच्या अटकेसाठी लवकरच पोलिसांची एक टिम जयपूरला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यश जिग्नेश मेहता हे ज्वेलर्स व्यापारी असून ते मुंबई सेंट्रल येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा ऑपेरा हाऊसच्या प्रसाद चेंबरमध्ये एक कार्यालय असून याच कार्यालयातून त्यांचा सोन्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार चालतो. गेल्या वर्षी यश मेहता यांची पंकजकुमार आणि सुशील यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीत त्यांनी ते दोघेही राजस्थानच्या जयपूर, विद्याधरनगरचे रहिवाशी असल्याचे असून त्यांचाही सोन्याच्या दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. यातील पंकजकुमारचा विनायक ज्वेलर्स आणि सुशीलचा आदियोगी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दोघांनी त्यांच्याशी सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. सुरुवातीला घेतलेल्या सोन्याचे त्यांनी दिलेल्या मुदतीत पेमेंट करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता. ऑगस्ट २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत त्यांच्याकडून पंकजकुमारने ७१ हजार ७६ हजार तर सुशीलने ५२ लाख ३५ हजार रुपयांचे असे सुमारे सव्वाकोटीचे सोन्याचे दागिने क्रेडिटवर घेतले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याचे पेमेंट केले नव्हते. वारंवार विचारणा करुनही ते दोघेही त्यांना प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांनी क्रेडिटवर घेतलेले दागिने परत करण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी त्यांना दागिनेही परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पकंजकुमार खिंची आणि सुशील पारीख यांच्याविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी ४०९, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच डी. बी मार्ग पोलिसांचे एक विशेष पथक चौकशीकामी जयपूर शहरात जाणार असल्याचे सांगण्यात आले.