दिड कोटीच्या शुद्ध सोन्यासह दागिन्यांचा अपहार
दोन ज्वेलर्स व्यापार्यांना गंडा घालणार्या आरोपींविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२४
मुंबई, – दागिने बनविण्यासाठी दिलेल्या शुद्ध सोन्यासह दागिन्यांचा अपहार करुन दोन ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार आणि काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही ज्वेलर्स व्यापार्याच्या तक्रारीवरुन एल. टी मार्ग पोलिसांनी एका कारागिरासह व्यापार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. पळून गेलेल्या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
मयंककुमार जैन हे माझगाव येथे राहत असून ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा झव्हेरी बाजार, पहिली अग्यारी लेनवर एम. व्ही ज्वेलर्स आणि के. एन ज्वेलर्स नावाचे दोन ज्वेलर्स दुकान आहे. या दोन्ही दुकानातून ते सोन्याचे दागिने होलसेलमध्ये विक्री करतात. गेल्या वर्षी त्यांची हाराधन मैतीशी ओळख झाली होती. हाराधन हा सोन्याचे दागिने बनविणारा कारागिर असून त्याच्या मालकीचे झव्हेरी बाजार, शेख मेमन स्ट्रिट परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याचा एक कारखाना आहे. त्याच्याशी ओळख झाल्यानंतर ते अनेकदा त्याला शुद्ध सोने देऊन त्याच्याकडून विविध डिझाईनचे दागिने बनवून घेत होते. गेल्या वर्षी त्याने त्यांच्यासाठी बारा ते तेरा वेळा दागिने बनवून दिले होते. त्यामुळे त्याच्यावर मयंकुमार जैन यांचा प्रचंड विश्वास होता. २५ एप्रिलने त्यांनी हाराधनला १ कोटी चार लाख रुपयांचे १४४५ ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. ४ मेपर्यंत सर्व दागिने बनवून देण्याचे त्याने त्यांना आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दागिने दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला होता, मात्र त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे ते हाराधनच्या कारखान्याजवळ गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना त्याचा कारखाना बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने त्याच्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्याविषयी कोणालाही काहीच माहिती नव्हती. दागिने बनविण्यासाठी घेतलेले एक कोटी चार लाख रुपयांचे शुद्ध सोने घेऊन हाराधन हा पळून गेला होता. त्यामुळे त्यांनी हाराधन मैतीविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली होती.
ही घटना ताजी असतानाच अशीच दुसरी घटना काळबादेवी परिसरात घडली. विशाल प्रविणकुमार जैन हे सोन्याचे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चिंचपोकळी येथे राहतात. त्यांचा काळबादेवी, अभिनंदन मार्केटमध्ये हेमदिप ज्वेल्स नावाचे एक दुकान आहे. सात महिन्यांपूर्वी त्यांची हितेशशी ओळख झाली होती. त्याने त्याचा काळबादेवी येथे सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्याची मुंबईसह इतर राज्यातील व्यापार्याशी चांगली ओळख असून त्यांना सोन्याच्या विक्रीतून चांगला फायदा करुन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांनी त्याने त्यांच्याकडून ४९ लाख ६५ हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने विक्रीसाठी घेतले होते. मात्र या दागिन्यांचे पेमेंट न करता किंवा दागिने परत न देता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे.