विक्रीसाठी घेतलेल्या पाच कोटीच्या साडेआठ किलो दागिन्यांचा अपहार
झव्हेरी बाजार येथील घटना; कर्मचार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० फेब्रुवारी २०२४
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे पाच कोटी रुपयांच्या साडेआठ किलो दागिन्यांचा व्यापार्याच्या कर्मचार्यांनी अपहार करुन फसवणुक केल्याची घटना झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ललित रतनचंदजी जैन या आरोपी कर्मचार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
अरविंद मदनलाल पारेख हे ज्वेलर्स व्यापारी असून गिरगाव परिसरात राहतात. त्यांचा झव्हेरी बाजार येथे डी. डी ज्चेल आणि शितल गोल्ड नावाचे सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. यातील डी. डी ज्वेलमधये त्यांची पत्नी ममता, भाचा विवेक भरत जैन तर शीतल गोल्डमध्ये जयेश मेहता आणि बहिण अनिता भरत जैन असे भागीदार आहेत. त्यांच्याकडे ललित जैन हा कामाला असून त्याच्यावर मुंबईसह मुंबईबाहेरील व्यापार्यांना सोन्याचे दागिने विक्री करणे, विक्रीतून आलेली रक्कम कार्यालयात जमा करण्याची जबाबदारी होती. ५ फेब्रुवारी आणि ६ फेब्रुवारीला ललित हा नेहमीप्रमाणे कार्यालयात आला आणि त्याने विक्रीसाठी विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर तो ८ फेब्रुवारीला पुन्हा कार्यालयात आला. यावेळी त्याने काही दागिन्यांची विक्री झाली असून काही दागिने विक्री करणे बाकी असल्याचे सांगितले.
१० फेब्रुवारीला त्याने आणखीन काही दागिने विक्रीसाठी घेतले होते. दोन दिवस तो कामावर आला नाही. त्यामुळे त्याला १२ फेब्रुवारीला फोन करुन दागिन्याबाबत विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्याने तो आता कामावर येणार नाही असे सांगितले. त्यामुळे त्याला विक्रीसाठी घेतलेले दागिने परत करण्यास तसेच विक्रीतून आलेली रक्कम कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अरविंद पारेख स्वत त्याच्या भाईंदर येथील घरी गेले त्याची विचारपूस करण्यासाठी गेले होते. यावेळी त्याने पेमेंटसह उर्वरित दागिने दुसर्या दिवशी जमा करण्याचे आश्वासन दिले. मात्र तो दुसर्या दिवशी कार्यालयात आला नाही. कॉल केल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. त्याच्या घरी गेल्यानंतर त्यांना ललित हा १४ फेब्रुवारीला घरातून निघून गेला आणि अद्याप आलाच नसल्याचे समजले. त्याच्याविषयी त्याची पत्नी, भाऊ इतर कुठल्याही नातेवाईकांना काहीच माहित नव्हती. त्यामुळे अरविंद पारेख यांनी काही ज्वेलर्स व्यापार्यांना फोन करुन ललित जैन हा दागिने विक्रीसाठी त्यांच्याकडे आला होता का याबाबत विचारणा केली. मात्र या व्यापार्यांनी ललित त्यांच्याकडे आला नसल्याचे सांगितले.
१६ फेब्रुवारीपर्यंत त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कार्यालयात आला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी ललित जैन यांच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी ललितने ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत त्यांच्या कार्यालयातून विविध डिझाईनचे चैन, ब्रेसलेट, मोठे कार, अंगठ्या, टॉप्स, पेंडल, मंगळसूत्र, वाटी, अंगठीतील खंडे असे ८ किलो ५६० ग्रॅम वजनाचे सुमारे पाच कोटी रुपयांचे दागिने विक्रीसाठी घेतले होते. मात्र ते दागिने परत न करता तसेच विक्री झालेल्या दागिन्यांचे पेमेंट न करता त्यांची फसवणुक केल्याचे नमूद केले होते. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत ललित जैनविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.