८५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक

झव्हेरीबाजार-काळबादेवीतील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ एप्रिल २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे ८५ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन तीन ज्वेलर्स व्यापार्‍यांची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार आणि काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या तीन गुन्ह्यांची नोंद केली आहे. निखील चंदूलाल चावडा, राजेश नगीनदास पारेख, सुरेश जैन आणि खेमराज रावल अशी या चौघांची नावे आहेत. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

दिपक मोहनलाल जैन हे भांडुप येथे राहत असून त्यांचा झव्हेरी बाजार येथे सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. बॉम्बे बुलियनसमोरील प्रकाश भवन येथे त्यांचे एक कार्यालय आहे. डिसेंबर २०२२ रोजी त्यांची एका मित्राने राजेश पारेखशी ओळख करुन दिल होती. राजेशने तो व्यापारी असल्याचे त्यांच्यासोबत व्यवसाय सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. २१ जून २०२३ रोजी त्याने त्यांच्याकडे सुमारे ३५ लाख रुपयांचे ५९२ ग्रॅम वजनाचे विविध मंगळसूत्रांची ऑर्डर दिली होती. दागिने घेतल्यानंतर त्याने त्यांना ३० लाखांचा एक धनादेश दिला होता. दागिन्यांच्या विक्रीतून उर्वरित रक्कम कॅश स्वरुपात देण्याचे मान्य केले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्याला ३५ लाखांचे मंगळसूत्र क्रेडिटवर दिले होते. २६ जूनला त्याने धनादेश बँकेत डिपॉझिट करण्यास सांगितले होते, त्यामुळे त्यांनी धनादेश बँकेत डिपॉझिट केला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यांनी त्याला फोनवरुन ही माहिती सांगितली. यावेळी त्याने त्यांना ऑगस्ट महिन्यांत पुन्हा धनादेश बँकेत डिपॉझिट करण्यास सांगितले. मात्र दुसर्‍या वेळेसही त्याचा धनादेश बाऊंन्स झाला. या घटनेनंतर त्यांनी त्याच्याकडे पेमेंटची मागणी केली. पेमेंट करता येत नसेल तर दागिने परत करा असे सांगितले होते. मात्र त्याने दागिन्यांची परस्पर दुसर्‍या व्यापार्‍यांना विक्री करुन दिपक जैन यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी राजेश पारेखविरुद्ध दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दुसर्‍या घटनेत निखील चंदूलाल चावडा या ज्वेलर्स व्यापार्‍याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संजयकुमार दलीचंद संचेती हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचे धनजी स्ट्रिट येथे कलश गोल्ड नावाचे एक दुकान आहे. निखील हा ज्वेलर्स व्यापारी असल्याने तो त्यांच्या परिचित होता. त्याने त्यांचा चुलत भाऊ केवलचंद संचेती यांच्यासोबत सोन्याच्या दागिन्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. त्यामुळे त्यांनी त्याची ओळख संजयकुमारशी करुन दिली होती. यावेळी निखिलने त्याचा काळबादेवी येथील विठ्ठलवाडीत मनीभद्र ज्वेलर्स नावाचे एक सोन्या-चांदीचे दुकान असल्याचे सांगितले होते. त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करुन त्याने त्यांच्याकडून क्रेडिटवर ३४ लाख ६२ हजार रुपयांचे ६८८ ग्रॅम वजनाचे सोने घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दागिन्याचे पेमेंट केले नाही किंवा दागिने परत आणून दिले नव्हते. दागिने घेऊन तो पळून गेल्याची खात्री होताच संजयकुमार संचेती यांनी निखीलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी निखीलविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

तिसर्‍या घटनेत सुरेश जैन आणि खेमराज रावल या दोघांनी रविंद्रनाथ पात्रा या व्यापार्‍याकडून ४०४ ग्रॅम वजनाचे सोळा नेकलेस घेतले होते. त्यामोबदल्यात त्यांना ३८२ ग्रॅम वजनाचे सोने दिले होते. उर्वरित पंधरा लाखांचे २३० ग्रॅम सोने देतो असे सांगून ते दोघेही पळून गेले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच रविंद्रनाथ पात्रा यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सुरेश जैन आणि खेमराज रावल या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या तिन्ही गुन्ह्यांतील आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या आरोपींनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काळबादेवीतील व्यापार्‍याची ३५ लाखांची फसवणुक
अन्य एका घटनेत काळबादेवी येथील एका ज्वेलर्स व्यापार्‍याची तीन ठगांनी सुमारे ३५ लाखांची फसवणुक केली. हिरेजडीत दागिन्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा या तिघांनी अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी अमरीश संघवी, महावीर जैन आणि अशोक यांच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवुणकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे. विलेपार्ले येथे मालव मुकेश पारेख हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा वंाद्रे येथील बीकेसी परिसरात हिरेसहीत दागिने होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय आहे. बीकेसी कार्यालयातील जबाबदारी त्यांचे वडिल मुकेश पारेख तर काळबादेवी येथील कार्यालयात स्वत मालव पारेख हे काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या परिचित अमरीश संघवी या व्यापार्‍याचे नाव सांगून एका अज्ञात व्यक्तीने त्यांना हिरेजडीत दागिन्यांची विक्रीसाठी व्हॉटअपवर काही फोटो पाठविले होते. दागिने पसंद पडल्याने त्यांनी ते दागिने खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी आकाश नाव सांगणार्‍या व्यक्तीला ३५ लाख रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र पेमेंट करुनही अमरीश संघवी आणि महावीर जैन यांनी हिरेजडीत दागिन्यांची डिलीव्हरी केली नाही. या घटनेनंतर त्यांनी वांद्रे येथील अमरीश संघवी यांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी कोणालाही दागिने विक्रीसाठी कॉल केला नसल्याचे सांगितले. त्यांचा नावाचा गैरवापर करुन अज्ञात व्यक्तीने ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर अमरीश संघवी, महावीर जैन आणि अशोक नाव सांगणार्‍या तिन्ही ठगाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page