गहाण ठेवलेल्या दागिन्यांची विक्री करुन महिलेची फसवणुक
कांदिवलीतील व्यावसायिकाविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जानेवारी 2026
मुंबई, – गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची परस्पर विक्री करुन एका महिलेची फसवणुक झाल्याचा प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आलाअ आहे. याप्रकरणी सावकारी व्यावसायिक ललित हाथी याच्याविरुद्ध कांजूरमार्ग पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि सावकरी कलमातर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात ललितने 48 तोळे सोन्यावर तक्रारदार महिलेला 20 लाखांचे कर्ज दिले होते, मात्र तिने दिलेले सोने तिला परत न करता तिच्या दागिन्यांची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्याने ते दागिने कोणाला विक्री केली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
अनुष्का अमीत उत्तेकर ही महिला भांडुप येथे राहत असून ती एका खाजगी खाद्य कंपनीत वितरक म्हणून कामाला आहे. याच कंपनीत अवनिश पांडे हे काम करत असल्याने ते एकमेकांच्या परिचित होते. दोन वर्षांपूर्वी तिला तिच्या व्यवसायाबाबत ऑडिटची जीएसटीची नोटीस आली होती. तिला जीएसटीची रक्कम भरण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे तिने तिच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली होती, मात्र तिला कोणीही मदत केली नाही. त्यामुळे तिने अवनिश पांडेला तिची समस्या सांगितली होती. त्याने तिची ओळख ललित हाथीशी करुन दिली. ललित हा कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत असून तो तिला पैसे देईल. त्यासाठी तिला त्याच्याकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतील असे सांगितले.
तिला पैशांची गरज असल्याने तिने त्याच्याकडे तिचे सोन्याचे दागिने ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याने तिला सव्वा टक्क्याच्या व्याजावर 20 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तिला दरमहा त्याला 25 हजार रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार होते. यावेळी तिने ललितची भेट घेऊन वीस लाख रुपये देण्याची विनंती करताना त्याला एका वर्षांत पूर्ण पेमेंट करुन त्याच्याकडील दागिने सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर अवनिश पांडे आणि अनुष्का उत्तेकर हे दोघेही त्याच्या चारकोप येथील दुकानात गेले होते. तिथे तिने त्याला तीस तोळे दागिने दिले, या दागिन्यांच्या मोबदल्यात त्याने तिला पंधरा लाख रुपये दिले होते.
काही दिवसांनी तिने त्याला आणखीन अठरा तोळे दागिने दिले, यावेळी त्याने तिला पाच लाख रुपये दिले होते.अशा प्रकारे तिने त्याला 48 तोळे दागिने देऊन त्याच्याकडून व्याजाने वीस लाख रुपये घेतले होते. जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीत तिने त्याला दरमाह 25 हजार रुपये व्याज दिले होते. सप्टेंबर महिन्यांत तिच्या पतीचा अपघात झाला होता, त्यामुळे तिला त्या महिन्यांचे व्याज देता आले नाही. यावेळी ललितने तिला व्याजाची रक्कम दिली नाहीतर तिचे दागिने विक्रीची धमकी दिली होती. काही दिवसांनी तिने त्याचे सर्व पैसे देऊन दागिने घेण्यासाठी येत असल्याचे सांगितले. मात्र तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता.
याच दरम्यान त्याने तिला तिचे सर्व दागिन्यांची विक्री केल्याचे सांगितले. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार अवनिश पांडेला सांगितली. ललित हा व्याजाचे पैसे देण्याचा व्यवसाय करत होता, मात्र त्यासाठी कुठलाही सावकारी परवाना नव्हता. त्यात गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने परस्पर विक्री करुन त्याने तिची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच तिने कांजूरमार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून ललित हाथीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याचा दागिन्यांचा अपहार करुन या दागिन्यांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.