बोगस पर्चेस ऑर्डर दाखवून पावणेसहा कोटीच्या गोल्ड कॉईनचा अपहार
गोरेगावच्या खाजगी कंपनीच्या कर्मचार्याला अटक व कोठडी
अरुण सावरटकर
3 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बोगस पर्चेस ऑर्डर दाखवून स्वतच्याच कंपनीला दुसर्या कंपनीला विविध ग्रॅम वजनाचे गोल्ड कॉईन पाठविल्याचे भासवून सुमारे पावणेसहा कोटीच्या गोल्ड कॉईन वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी सुनिल जगन्नाथ गुप्ता या 44 वर्षांच्या आरोपी कर्मचार्याला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. सुनिल हा तक्रारदाराच्या खाजगी कंपनीचा कर्मचारी असून त्याने बोगस दस्तावेज बनवून, स्वतची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी या गोल्ड कॉईनचा अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
नरेश कुंदनमल जैन हे गोरेगाव येथे राहत असून त्यांचा कॉर्पोरेट गिफ्टींगचा व्यवसाय आहे. गोरेगाव परिसरात त्यांची स्वतची कंपनी असून या कंपनीच्या कार्यालयातून त्यांचे सर्व व्यवहार चालतात. कंपनीतर्फे ग्राहकांच्या मागणीप्रमाणे गिफ्टच्या वस्तू पुरविण्याचे काम चालते. सुनिता गुप्ता हा त्यांचा परिचित असून दोन वर्षांपूर्वी तो त्यांच्या कार्यालयात आला होता. त्यांच्या व्यवसायात मदत करण्याचे आमिष दाखवून त्यांना व्यवसायात चांगला फायदा करुन देतो असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला त्यांच्या व्यवसायात सामिल करुन घेतले होते. त्यानंतर त्यांनी गोरेगाव येथे एक भाड्याने गाळा घेऊन ब्रॅण्ड हर्मनी नावाची एक कंपनी सुरु केली होती. तिथे त्यांनी सुनिल गुप्ताला कामावर ठेवले होते. त्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती.
गेल्या दोन वर्षांपासून तोच कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत होता. त्यासाठी त्याला कंपनीचे दोन मेल आयडी आणि पासवर्ड देण्यात ाअले होते. तो वेगवेगळ्या कंपनीशी ऑनलाईन संपर्क साधून त्यांच्याशी व्यवहार करत होता. वर्षभरात त्याने कंपनीला चांगला फायदा मिळवून दिला होता, त्यामुळे नरेश जैन यांना त्याच्यावर विश्वास बसला होता. ऑगस्ट 2024 रोजी त्याने मॅक्लियोडस फार्मास्टिकल लिमिटेड कंपनीला गोल्ड कॉईन पाहिजे असल्याचे त्यांना प्रत्यक्षात भेटून सांगितले होते. त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनीकडून पर्चेस ऑर्डर घेण्यास सांगितले होते.
काही दिवसांनी त्याने कंपनीचे पर्चेस ऑर्डर आणून दिले. त्यानंतर त्याच्या सांगण्यावरुन त्यांच्या कंपनीने 2 कोटी 46 लाख 84 हजार रुपयांचे 24 कॅरेटचे दहा, वीस, पन्नास आणि शंभर ग्रॅमचे 3400 ग्रॅम वजनाचे गोल्ड कॉईन बुक करुन सुनिल गुप्ताच्या स्वाधीन केले होते. त्याने ते गोल्ड कॉईन संबंधित कंपनीला पाठविल्याचे तसेच कंपनीकडून माल स्विकारलेला शिक्का व सही केलेला टॅक्स इन्व्हाईस सादर केले होते. काही दिवसांनी या कंपनीने त्यांच्याकडे आणखीन काही गोल्ड कॉईनची मागणी करुन दुसरा ऑर्डर पाठविल्यानंतर संपूर्ण पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सुनिल गुप्ताच्या सांगणयावरुन त्यांनी पुन्हा कंपनीला 3 कोटी 17 लाख 96 हजार 3600 ग्रॅम वजनाचे विविध गोल्ड कॉईनची डिलीव्हरी केली होती.
मार्च 2025 रोजी त्यांनी सुनिल गुप्ताकडे गोल्ड कॉईनच्या पेमेंटबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने 7 हजार ग्रॅमचे 5 कोटी 72 लाख 20 हजार 620 रुपयांचे गोल्ड कॉईन कंपनीला डिलीव्हरी केली नाही. गोल्ड कॉईनचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन बोगस दस्तावेज सादर करुन कंपनीची फसवणुक केल्याची कबुल दिली. त्याला आर्थिक अडचण होती, ती अडचण दूर करुन लवकरच कंपनीला पेमेंट देण्याचे आश्वासन दिले होते. या माहितीने त्यांन धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांचा अकाऊंट विभागाची जबाबदारी असलेला भाऊ निर्मल कुंदनमल जैन यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती.
यावेळी मॅक्लियोडस फार्मास्टिकल लिमिटेड कंपनीला कुठलीही ऑर्डर देण्यात आली नव्हती. सुनिल गुप्ताने डिलीव्हरीचे सादर केलेले सर्व दस्तावेज बोगस होते. त्याने बोगस पर्चेस ऑर्डर दाखवून त्यांचा विश्वास संपादन करुन ही फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच नरेश जैन यांनी वनराई पोलीस ठाण्यात सुनिल गुप्ताविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून सुमारे पावणेसहा कोटीच्या गोल्ड कॉईनचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सुनिल गुप्ताला बुधवारी पोलिसांनी अटक केली होती.
चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांची चौकशी सुरु आहे. त्याने या गोल्ड कॉईनचे काय केले, त्याची कोणाला विक्री केली आहे का, या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.