दागिने बनविण्यासाठी दिलेल्या हिर्यांसह सोन्याचा अपहार
४५ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० डिसेंबर २०२४
मुंबई, – सणांनिमित्त आगाऊ दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे ४५ लाख रुपयांच्या ३५१ शुद्ध सोने आणि ५१ कॅरेटचे हिरे आदी मुद्देमालाचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार गिरगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रोदूत मिहीर खान या हिरे कारागिराविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रोदूत हा मूळचा कोलकाताचा रहिवाशी असून त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच तिथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रौनक भगवतीलाल लोढा हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचा गिरगाव येथील ऑपेरा हाऊस, पंचरत्न इमारतीमध्ये शुभ ज्वेलरी इंडिया नावाचे एक कार्यालय आहे. त्यांचा होलसेलमध्ये सोन्याचे दागिने आणि हिरे विक्रीचा व्यवसाय आहे. झव्हेरी बाजार येथून कच्चे सोने आणल्यानंतर ते हिरेजडीत सोन्याचे दागिने बनवून त्याची विविध ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री करतात. प्रोदूत हा हिरेजडीत दागिने बनविणारा कारागिर असून त्यांच्या परिचित आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते त्याच्याकडून सोन्यासह हिरेजडीत दागिने बनवून घेत होते. दिलेल्या मुदतीत त्याने दागिने बनवून दिल्याने त्यांचा त्याच्यावर विश्वास होता. मे महिन्यांत त्यांनी त्याला आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी सणानिमित्त काही सोने आणि हिरेजडीत दागिने बनविण्याची ऑर्डर दिली होती. त्यासाठी त्यांनी त्याला सुमारे ३५१ शुद्ध सोने आणि ५१ कॅरेटचे हिरे दिले होते. यावेळी त्याने त्याने त्यांना साठ दिवसांत सर्व दागिने बनविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र साठ दिवसानंतर त्याने त्यांना दागिने बनवून दिले नाही. डिझाईनमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याचे सांगून त्याने त्यांच्याकडे आणखीन काही दिवसांची मुदत मागून घेतली होती.
पंधरा दिवसांनी कॉल केल्यानंतर त्याने तो आजारी असून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचा बहाणा केला होता. त्यानंतर तो कोलकाता येथील गावी निघून गेला होता. यावेळी त्याने मुंबईत परत आल्यानंतर त्यांचे दागिने बनवून देतो असे सांगितले. मात्र तो पुन्हा मुंबईत आला नाही. त्याने त्याचा मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे त्यांचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. भाईंदर येथील राहत्या घरी कुलूप लावले होते, त्याने भाड्याचे पैसेही दिले नव्हते. सोने आणि हिरेजडीत दागिने बनविण्यासाठी दिलेल्या ४५ लाखांच्या हिर्यासह सोन्याचा प्रोदूत खानने अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रोदूत खानविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी डी. बी मार्ग पोलिसांचे एक टिम लवकरच कोलकाता येथे जाणार आहे. प्रोदूतने रौनक लोढा यांच्यासह इतर काही व्यापार्यांच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.