चेन्नई-मुंबई विमान प्रवासादरम्यान सतरा लाखाचे दागिने चोरीला
अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – चेन्नई कार्यालयातून मुंबईतील कार्यालयात पाठविण्यात आलेल्या एका खाजगी कंपनीचे सुमारे सतरा लाखांचे हिरेजडीत दागिने असलेल्या पॅकेट प्रवासादरम्यान चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विमानतळ पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विमानतळावरील कर्मचार्यानेच ही चोरी केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या मुंबई-चेन्नईतील सर्व कर्मचार्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
महेंद्र भोजराज पाचार हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांची जेएमडी एक्सप्रेस लॉजिस्टिक नावाची एक कंपनी असून ही कंपनीत मौल्यवान वस्तू एका राज्यातून दुसर्या राज्यात ट्रान्सपोर्टेशन काम करते. त्यांच्या कंपनीचे देशभरात विविध ठिकाणी कार्यालय असून कंपनीचे मुख्य कार्यालय विलेपार्ले परिसरात आहे. याच कार्यालयातून इतर कार्यालयातील कामाचे नियोजन केले जाते. 7 डिसेंबरला त्यांच्या कंपनीला चेन्नई येथील कार्यालयातून मुंबई कार्यालयात काही सोन्याचे तसेच हिर्यांचे दागिने पार्सल पाठवायचे होते. त्यामुळे त्यांनी ते पार्सल पॅक करुन एका कुरिअर कंपनी मार्फत पाठविले होते. ते पार्सल विमानातून चेन्नई येथून मुंबई कार्गो येथे येणार होते. त्यामुळे चेन्नई कार्यालयातील सर्व पार्सल रिसीव्ह करण्याची जबाबदारी घेरवरचंद्र लखार यांच्याकडे सोपविण्यातआले होते.
ठरल्याप्रमाणे पार्सल घेण्यासाठी घेरवचंद्र लखार हे विमानतळावर आले होते. यावेळी त्यांना इतर सर्व पार्सल मिळाले, मात्र जेएमडी कंपनीचे एक पार्सल गायब होते. या पार्सलमध्ये 17 लाख 24 हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने होते. त्यामुळे चेन्नई कार्यालयासह कुरिअर कंपनीने त्यांच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात त्यांना काहीही संशयास्पद दिसून आले नाही. चेन्नई-मुंबई विमान प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने हिरेजडीत दागिने असलेले पार्सल चोरी केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महेंद्र पाचार यांनी विमानतळ पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.