मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – विदेशात आणलेल्या गोल्ड डस्ट तस्करीप्रकरणी दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद गुलरेज मोहम्मद इरफान आणि माझिद रशीद अशी या दोन प्रवाशांची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेश व उत्तराखंडचे रहिवाशी आहे. त्यांच्याकडून या अधिकार्यांनी सव्वाकोटीचे दोन किलो गोल्ड डस्ट हस्तगत केले आहेत. यातील मोहम्मद गुलरेज हा शेतकरी तर माझिद एका कारखान्यात कामाला आहे. या दोघांनाही विमानतळाबाहेर ते गोल्ड डस्ट एका व्यक्तीला देण्यास सांगण्यात आले होते. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी विदेशात आलेले मोहम्मद गुलरेज आणि माझिद रशीद हे दोघेही विमानतळाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते. याच दरम्यान या दोघांनाही हवाई गुप्तचर विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे दोन किलो एकशे तीस ग्रॅम वजनाचे गोल्ड डस्ट सापडले. त्याची किंमत सुमारे सव्वाकोटी रुपये इतकी आहे. या दोघांनाही ते गोल्ड डस्ट आबिद आणि रसद नावाच्या दोन व्यक्तींनी दिले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर त्यांना ते पॅकेट सांकेतिक इशारा देणार्या व्यक्तींना देण्यास सांगण्यात आले. माझिद हा उत्तराखंडच्या हरिद्वार, झाब्रेर शितलपूरचा रहिवाशी असून तो पंतजली फॅक्टरीमध्ये कामाला आहे. मोहम्मद गुलरेज हा शेतकरी असून उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगर, गडला गावात राहतो. गोल्ड डस्टची तस्करी केल्याप्रकरणी या दोघांनाही नंतर या अधिकार्यांनी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.