गोल्ड गुंतवणुकीच्या नावाने 49 वर्षांच्या महिलेची फसवणुक
साडेसतरा लाखांचे सोने घेऊन ज्वेलर्स व्यापार्याचे पलायन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2025
मुंबई, – गोल्ड गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका 49 वर्षांच्या महिलेची ज्वेलर्स व्यापार्याने फसवणुक केल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. साडेसतरा लाखांचे सोने घेऊन पळून गेलेल्या ज्वेलर्स व्यापारी राजेश शाह याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
यातील तक्रारदार महिला राजश्री जयवंत बोलाईकर ही महिला कांदिवलीतील महावीरनगर परिसरात राहते. एका खाजगी कंपनीत ती कामाला असून तिथेच तिची शाह ज्वेलर्सचे मालक राजेश शाहशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर तिने त्याच्याकडून अनेकदा सोने खरेदी केले होते. ऑगस्ट 2016 रोजी राजेशने तिला गोल्डबाबत एक योजना सांगितली होती. त्यात तिने गोल्डमध्ये गुंतवणुक केल्यास या गोल्डमध्ये तिला दरमाह अर्धा ग्रॅम सोने वाढवून मिळेल. तिला गोल्ड हवे असल्यास पंधरा दिवसांच्या मुदतीत तिला गोल्ड किंवा गोल्डची रक्कम परत केली जाईल असे सांगितली. तिने गुंतवणुक म्हणून काही सोन्याचे बार खरेदी केले होते. त्यामुळे तिला राजेशची ही योजना चांगली वाटली होती. तिने त्याच्याकडे गोल्ड गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
ठरल्याप्रमाणे तिने त्याला गुंतवणुकीसाठी टप्याटप्याने साडेसतरा लाख रुपयांचे 254 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार दिले होते. या गुंतवणुकीवर त्याने तिला सुरुवातीला परतावा म्हणून दिड लाख रुपये दिले होते. 2021 साली तिला तिच्या व्यवसायासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे तिने राजेश शाहची भेट घेऊन तिने गुंतवणुक केलेल्या सोन्याची मागणी केली होती. मात्र तो तिला सतत विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. तिचा कॉल घेत नव्हता. ऑक्टोंबर 2023 रोजी ती त्याच्या ज्वेलर्स शॉपमध्ये गेली होती. यावेळी तिला राजेशचा शॉप बंद असल्याचे दिसून आले.
याबाबत तिने चौकशी केली असता राजेश हा काही महिन्यांपूर्वीच शॉप बंद करुन पळून गेल्याचे समजले. त्याच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजेश शाहविरुद्ध सोन्याचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काहींची फसवणुक केल्याचे बोलले जाते.