मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० मार्च २०२४
मुंबई, – विविध ज्वेलर्स व्यापार्यांना विक्रीसाठी घेतलेल्या १ कोटी ६० लाख रुपयांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी विजय भगवतीलालजी बोरदिया या वॉण्टेड आरोपीस विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विजयने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
विकास संपतलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांची मिडास डायमंड प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी सोन्या-चांदीचे दागिने बनविण्याचे तसेच दागिन्यांची विक्रीचा व्यवसाय करते. त्यांच्या मालकीचे विलेपार्ले येथे सत्कार ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. चार वर्षांपूर्वी त्यांची त्यांचा मित्र सुरेंद्र जैनने विजय बोरदियाशी ओळख करुन दिली होती. तो कमिशनवर सोने आणि हिर्यांच्या विक्रीचे काम करत असून बोरदिया जेम्स ऍण्ड ज्वेलरी या कंपनीच्या नावाने सर्व व्यवहार करतो. त्याचे अनेक ज्वेलर्स व्यापार्यासह शॉप मालकांशी ओळख आहे. त्यामुळे त्याने त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुरेंद्र जैन हा त्यांचा मित्र होता, त्यामुळे त्याच्या सांगण्यावरुन त्यांनी विजयला क्रेडिटवर दागिने विक्रीसाठी देण्यास सुरुवात केली होती.
नोव्हेंबर २०२० रोजी त्याने त्यांच्याकडून सुमारे ६० लाख रुपयांचे दागिने घेतले होते.त्याचे पेमेंट वेळेवर करुन त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यात दागिन्यांचा व्यवहार सुरु होता. ४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२१ या कालावधीत त्याने त्यांच्याकडून १ कोटी ६० लाख रुपयांचे विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने विक्रीसाठी घेतले होते. दिलेल्या मुदतीत त्याने दागिने किंवा दागिने विक्रीतून आलेले पेमेंट जमा केले नव्हते. त्यामुळे विकास जैन यांनी त्याला फोन केला होता. यावेळी त्याने दुकानात येऊन सविस्तर बोलतो असे सांगून त्याचा फोन बंद केला होता. दोन-चार दिवसांनी ते त्याला फोन करत होते, मात्र प्रत्येक वेळेस त्यांना त्याचा फोन बंद असल्याचे दिसून आले. मार्च २०२३ रोजी ते त्याच्या विलेपार्ले येथील राहत्या घरी गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना विजय हा फ्लॅट सोडून निघून गेल्याचे समजले. याच दरम्यान त्यांना त्यांच्या एका नातेवाईकांकडून विजय हा सांताकुज येथील वाकोला, पंकज अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे समजले होते. त्यामुळे ते तिथे गेले होते. यावेळी विजयने दागिन्यांची विक्री झाली असून त्याला अद्याप पेमेंट मिळाले नाही. त्यामुळे पेमेंट मिळाल्यानंतर तो त्यांना पैसे देईल. तोपर्यंत मला कॉल किंेवा भेटण्याचा प्रयत्न करु नका असे सांगितले.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विजयविरुद्ध विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नोव्हेंबर २०२३ रोजी पोलिसांनी विजयविरुद्ध १ कोटी ६० लाख रुपयांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन विकास जैन यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या चार महिन्यांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असातनाच त्याला गुरुवारी ७ मार्चला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने दागिन्यांची विक्री करुन पैशांचा अपहार केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.