आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ कोटी ७१ लाखांचे सोने जप्त
सोने तस्करीप्रकरणी दोन दिवसांत नऊ प्रवाशांवर कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी १ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. याप्रकरणी नऊ प्रवाशांवर अटकेची कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान गेल्या १७ दिवसांत ७५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद करुन या अधिकार्यांनी सुमारे ३१ कोटीचे सोने जप्त केल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांत विदेशातून सोन्याच्या तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा सोन्याची तस्करी करणार्या प्रवाशांविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतर्ंगत गेल्या दोन दिवसांत विदेशात सोन्याची तस्करी करणार्या नऊ प्रवाशांना अटक करण्यात आली. या प्रवाशांकडून या अधिकार्यांनी तीन किलो वजनाचे १ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. तस्करांनी ते सोने कपडे आणि बॅगेच्या आत विशिष्ट कप्पा करुन आणले होते तर काही प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणल्याचे उघडकीस आले. गेल्या काही दिवसांत सीमा शुल्क विभागाने अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेऊन गेल्या सतरा दिवसांत ७५ हून अधिक सोन्याच्या तस्करीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. याच गुन्ह्यांत काही प्रवाशांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे ३१ कोटीचे सोने जप्त केले आहे.