अडीच कोटीच्या तीन किलो सोने रॉबरीचा पर्दाफाश

पाचही आरोपींना काही तासात मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जून 2025
मुंबई, – नागपाडा येथे भरस्त्यात सुमारे अडीच कोटीचे तीन किलो सोने रॉबरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात नागपाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून काही तासांत पोलिसांनी अटक केली असून या आरोपींकडून चोरीचे सर्व सोने हस्तगत करण्यात आले आहे. विनायक अजय दळवी, मंगेश पंढरीनाथ शिंदे, अब्दुल हकीम अब्दुल कादिर शेख, शहनवाज हुसैन खान आणि संतोषकुमार जैन अशी या पाचजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबईतील रहिवाशी असलेले तक्रारदार राजन शांताराम पावसकर हे लोअर परेल येथील एका ज्वेलर्स कंपनीत कामाला आहे. गुरुवारी सकाळी ते त्यांच्या पुतण्या तेजससोबत त्याच्या बाईकवरुन दिड तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि दिड तोळ्याचे बिस्कीट असे 2 कोटी 55 लाख रुपयांचे तीन किलो सोने घेऊन जात होते. त्यांची बाईक नागपाडा येथील डायना ब्रिज, नवजीवन सोसायटीजवळ येताच दुसर्‍या बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना ओव्हरटेक केले. त्यांच्याशी हुज्जत घालून तसेच धक्काबुक्की करुन सोने असलेली बॅग घेऊन पलायन केले होते.

या घटनेनंतर राजन पावसकर यांनी नागपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या रॉबरीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर युनिट तीन आणि पाचच्या अधिकार्‍यांनी पळून गेलेल्या अब्दुल हाकीम याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्यासह इतर चौघांनी ही रॉबरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे सर्व अडीच कोटीचे सोन्याचे दागिने आणि बिस्कीट हस्तगत केले आहे.

या मुद्देमालासह आरोपीला पुढील चौकशीसाठी नागपाडा पोलिसांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर नागपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने वेगवेगळ्या परिसरातून मगेश शिंदे, शहनवाज खान, संतोषकुमार जैन व विनायक दळवी या चौघांना अटक केली. अटकेनंतर या पाचही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. रॉबरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page