दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सोन्यासह चांदीचा अपहार
४० लाखांच्या अपहारासह फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – विश्वासाने दागिने बनविण्यासाठी तसेच रिपेरिंगसाठी दिलेल्या सोन्यासह चांदीच्या दोघांनी अपहार केल्याची घटना झव्हेरी बाजार आणि काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या दोघांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मदन मंगू दास आणि यादव मोहनलाल पाल अशी या दोघांची नावे असून या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार विकास रतनलाल कोठारी हे डोंबिवली येथे राहत असून त्यांचा झव्हेरी बाजार येथील मिर्झा स्ट्रिट, झिनाव हाऊसमध्ये सोन्याचा दागिने विक्रीसह दागिने बनविण्याचा कारखाना आहे. यादव पाल हा त्यांचा परिचित कारागिर आहे. ते त्याच्याकडेच सोने देऊन सोन्याचे विविध दागिने बनवून घेत होते. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत त्यांनी त्याला १७ लाख ७७ हजार रुपयांचे २४८ ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. मात्र त्याने दागिने न बनविता सोन्याचा अपहार करुन पलायन केले होते. २९ जानेवारीला हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार हिरालाल मिश्रीलाल चौधरी हे चांदीचे व्यापारी आहेत. ते भाईंदर परिसरात राहत असून त्यांचा काळबादेवी रोडवर, दादीशेठ अग्यारी लेनजवळ एक शॉप आहे. जानेवारी महिन्यांत त्यांनी मदन दास याला २२ लाख ८९ हजार रुपयांचे चांदीचे दागिने पॉलिश आणि रिपेरिंगसाठी दिले होते. मात्र त्याने ते दागिने घेऊन पलायन केले होते. दोन्ही प्रकार तक्रारदारांच्या लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या दोघांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.