विदेशातून मुंबईत होणार्या सोने तस्करीचा डीआरआयकडून पर्दाफाश
आफ्रिकन नागरिकासह चौघांना अटक; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मार्च २०२४
मुंबई, – विदेशातून मुंबई शहरात होणार्या कोट्यवधी रुपयांच्या सोने तस्करीचा डीआरआयच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. सोने तस्करी करणारी ही एक टोळी असून या टोळीशी संबंधित दोन आफ्रिकन नागरिकासह कॅरिअर म्हणून काम करणार्या दोन कर्मचारी अशा चौघांना या अधिकार्यांनी अटक केली आहे. या कारवाईत ९ किलो ६७० ग्रॅम वजनाचे सोने, १८ किलो ४८० ग्रॅम वजनाची चांदी, १ कोटी ९२ लाखांचे भारतीय आणि १० कोटी ४८ लाख रुपयांचे विदेशी चलनाचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या चारही आरोपींना किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विदेशातून मुंबईत सोने तस्करी करणारी एक टोळी असून ही टोळी विदेशातून तस्करीमार्गे आणलेले सोने झव्हेरी बाजार येथे विदेशी खुणा काढून त्याची मार्केटमध्ये विक्री करत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यामुळे या टोळीविषयी जास्तीत जास्त माहिती काढून या अधिकार्यांनी तपास सुरु केला होता. ही चौकशी सुरु असताना एका संशयिताला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. तो आफ्रिकन नागरिकासाठी कॅरिअर म्हणजे वाहक म्हणून काम करत होता. या आरोपींकडून सोने घेतल्यानंतर तो सोन्यावरील विदेशी खुणा काढून त्यावर प्रक्रिया करत होता. त्यानतर ते सोने त्यांच्या सांगण्यावरुन संबंधित व्यक्तीला दिले जात होते. त्यामुळे या अधिकार्यांनी कामगाराची भरती करणार्या कार्यालयात जाऊन चौकशी केली होती. तेथून या अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले होते. सोने खरेदीसाठी ही रक्कम तिथे पाठविण्यात आली होती. या कार्यालयातून मिळालेल्या माहितीवरुन या अधिकार्यांनी सोने खरेदी करणार्या एका कार्यालयात छापा टाकला होता.
या कार्यालयातून या अधिकार्यांनी ३५१ ग्रॅम वजनाचे विदेशी सोन्याचे तुकडे, १८१८ ग्रॅम वजनाचे चांदी आणि १ कोटी ९२ लाख रुपयांचे भारतीय चलन जप्त केले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या दोघांना या अधिकार्यांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून या कटातील मुख्य आरोपी झव्हेरी बाजारातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी दोन आफ्रिकन नागरिकांना अटक केली. या चौघांनी भारतात होणार्या सोन्याच्या तस्करीच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत एक खरेदाराच्या कार्यालयात या अधिकार्यांनी छापा टाकला होता. मात्र छाप्यापूर्वीच तो पळून गेला होता. दोन्ही आफ्रिकन नागरिक कटातील मुख्य आरोपी असून इतर दोघेजण त्यांच्याकडे कॅरिअर म्हणून काम करत होते. या कामासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. अटकेनंतर या चारही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत या अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदीसह भारतीय आणि विदेशी चलन जप्त केले आहे. चारही आरोपींच्या चौकशीतून त्यांच्या इतर आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.