हंटर बुलेटची इलेक्ट्रीक पोलला धडक लागून दोघांचा मृत्यू
ट्रिपल सीट जाणार्या तिन्ही तरुणांनी मद्यप्राशन केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 जुलै 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या हंटर बुलेटची इलेक्ट्रीक पोलला धडक लागून झालेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा तिसरा मित्र जखमी झाला. शिवम झा (27) आणि रेहान चौधरी (22) अशी या दोन्ही मृत तरुणांची नावे आहेत तर जखमीमध्ये दिनेश तेवर या 25 वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. याप्रकरणी बाईक चालविणार्या शिवमविरुद्ध गोराई पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह एका मित्राच्या मृत्यूस तर दुसर्या मित्राला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश निवतकर यांनी सांगितले. प्राथमिक तपासात या तिघांनी मद्यप्राशन केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
हा अपघात मंगळवारी सकाळी साडेसात ते आठ वाजता वाजता बोरिवलीतील गोराई, उत्तन रोड, कुमार रेसीडेन्सीसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवम झा, रेहान चौधरी आणि दिनेश तेवर हे तिघेही अॅण्टॉप हिल येथील सायन-कोळीवाड्यातील रहिवाशी असून एका कॉलसेंटरमध्ये कामाला होते. मंगळवारी पहाटे शिवम हा त्याच्या हंटर बुलेटवरुन रेहान आणि दिनेशसोबत गोराई येथे पार्टी करण्यासाठी आला होता. यावेळी या तिघांनी मद्यप्राशन केले होते. गोराई येथे आल्यानंतर या तिघांनी पुन्हा मद्यप्राशन केले होते. सूर्योदयाचे फोटो काढण्यासाठी ते तिघेही शिवमच्या बुलेटवरुन जात होते. यावेळी शिवम हा भरवेागत बुलेट चालवत होता.
सकाळी साडेसात ते आठ वाजता उत्तन रोड, कुमार रेसीडेन्सीसमोर ही बुलेट येताच शिवमचा बुलेटवरील ताबा सुटला. त्याने तिथे असलेल्या इलेक्ट्रीक पोलला जोरात धडक दिली होती. त्यात ते तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच गोराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी तिघांनाही पोलिसांनी जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे शिवम आणि रेहान या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित् केले. दिनेश हा जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. त्याच्या जबानीवरुन घडलेला प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शिवमविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह दोघांच्या तर एकाला जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृत दोघांचे मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. जखमी दिनेशची मेडीकल करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना आलेला नाही. मात्र जबानीत त्याने तिघांनीही मद्यप्राशन केल्याची कबुली दिली. अपघातात शिवम आणि रेहान यांच्या मृत्यूची वृत्त समजताच सायन-कोळीवाडा परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती.