दारु पाजून तराट करुन हत्येनंतर मृतदेहाचे सात तुकडे केले

टॅटूवरुन हत्येचा पर्दाफाश करुन मुख्य आरोपीस अटक

0

राजू परुळेकर
१३ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – आधी दारु पाजून तराट केले आणि नंतर २१ वर्षांच्या मित्राची अत्यंत क्रुरपणे हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे सात तुकडे करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र मृतदेहाच्या हातावरील टॅटूवरुन मृत तरुणाची ओळख पटली आणि हत्येचा पर्दाफाश करण्यात गोराई पोलिसांना यश आले. हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मोहम्मद सत्तारला अखेर पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही, मात्र प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रघुनंदन पासवान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो मोहम्मद सत्तारचा मित्र आहे. ते दोघेही बिहारच्या एकाच गावचे रहिवाशी आहे.

१० नोव्हेंबरला दुपारी पाऊणच्या सुमारास बोरिवलीतील दरिया किनार्‍याकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला दुर्गंधी येत असल्याचे काही रहिवाशांच्या लक्षात आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच या रहिवाशांनी ही माहिती गोराई पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर गोराई पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तिथे धाव घेतली होती. शेफाली दरिया किनार्‍याजवळील रस्त्याच्या बाजूकडील जंगल सदृश्य झाडीमध्ये पोलिसांना चार गोणी सापडल्या. या गोणी उघडून पाहिल्यानंतर त्यात पोलिसांना एका तरुणाच्या मृतदेहाचे सात तुकडे सापडले होते. या तरुणाची हत्या करुन नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर ते तुकडे गोणीत भरुन मारेकर्‍याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पुरुष जातीच्या या मृतदेहाचे वय अंदाजे २० ते ३५ होते. त्याच्या उजव्या हातावर आरके असे टॅटूने गोंदलेले होते. पंचनामा केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे शासकीय हॉस्पिटलमध्ये पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले होते.

याप्रकरणी गोराई पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून मारेकर्‍याचा शोध सुरु केला होता. मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसासाठी आव्हान होते, मात्र टॅटूवरुन पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पंधरा दिवसांत मिसिंग झालेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती काढत असताना अंधेरी पोलीस ठाण्यात एका तरुणाची मिसिंगची तक्रार त्याच्या वडिलांनी केल्याचे उघडकीस आले. तो मृतदेह त्याच्या वडिलांना दाखविल्यानंतर त्याने तो मृतदेह त्यांचा मुलगा रघुनंदन पासवान याचा असल्याचे सांगितले. रघुनंदन हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या पुण्यात नोकरी करत होता. ३१ ऑक्टोंबरला पुण्यातून भाईंदरला आला होता. तो मोहम्मद सत्तारला भेटला होता. त्यामुळे पोलिसांनी मोहम्मद सत्तारचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला भाईंदर पोलिसांनी ताब्यात घेऊन गोराई पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्यानेच रघुनंदनची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. गुरुवारी दुपारी त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.
बहिणीशी प्रेमसंबंध जिवावर बेतले
रघुनंदन आणि मोहम्मद सत्तार हे दोघेही बिहारचे रहिवाशी असून एकमेकांच्या परिचित होते. त्यांची चांगली मैत्री होती. मोहम्मद सत्तारचे आई-वडिल आणि दोन भाऊ त्याच्या गावी राहतात तर त्याच्यासह त्याचा दुसरा बोरिवली परिसरात राहतो. तो सध्या भाईंदर खाडीजवळील एका झोपडीत त्याच्या पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होता. मासे, मटण आणि किचन विक्री करुन तो स्वतचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याला चार बहिणी असून त्यापैकी लहान बहिणीचे रघुनंदनसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा मोबाईलवर संभाषण करत होते. ही माहिती अलीकडेच मोहम्मद सत्तारला समजली होती. यावेळी त्याचा राग अनावर झाला होता. त्यामुळे त्याने रघुनंदनच्या हत्येचा कट रचला होता. त्याने त्याला पुण्यातून मुंबईत बोलाविले होते.

ठरल्याप्रमाणे ३१ ऑक्टोंबरला रघुनंदन हा मुंबईत आला होता. तेथून तो त्याच्या अंधेरीतील नातेवाईकाकडे गेला होता. तेथूनच त्याने मोहम्मद सत्तारला कॉल केला होता. त्याने त्याला भाईंदरला बोलाविले होते. तिथेच त्याच्या लहान बहिणीला बोलाविले आहे असे सांगितले. त्यामुळे रघुनंदन हा भाईंदरला गेला. तिथे रात्री या दोघांनी मद्यप्राशन आणि नशा केले होते. दारुचा ओव्हरडोस झाल्याने रघुनंदनने उलट्या केल्या होत्या. त्यानंतर तो झोपडीत झोपला होता. त्यानंतर त्याने पुन्हा मद्यप्राशन केले. रात्री उशिरा त्याने रघुनंदनची झोपेतच सुरीने गळा कापून हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यसाठी त्याने मृतदेहाचे सात तुकडे केले. ते तुकडे त्याने चार पेंटच्या बकेटमध्ये भरुन वेगवेगळ्या प्लास्टिक गोणीमध्ये पॅक केले.

दुसर्‍या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला त्याने रिक्षातून गोराईतील जंगलात मृतदेहाचे तुकडे असलेले गोणी फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान रघुनंदनचा संपर्क होत नसल्याने त्याच्या वडिलांनी अंधेरी पोलीस ठाण्यात त्याची मिसिंग तक्रार केली होती. कारण त्याचे लास्ट लोकेशन अंधेरी येथे दाखवत होते. बहिणीसोबत रघुनंदनचे संबंधाला मोहम्मद सत्तारचा विरोध होता. त्याच्याच रागातून त्याने त्याच्या हत्येचा कट रचला होता. त्याला दारु पाजून तराट करुन त्याची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करुन त्याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र रघुनंदनच्या हातावरील टॅटूवरुन त्याची ओळख पटली आणि मोहम्मद सत्तारला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page