मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुंबईतील उत्तर उपनगरात सुरु असलेल्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी विशाखा ऊर्फ निलम नावाच्या एका मुख्य आरोपीस महिलेस पोलिसांनी अटक केली. तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. अटकेनंतर या महिलेसह दोन्ही बळीत तरुणींना पुढील कारवाईसाठी गोराई पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. विशाखाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या दोन्ही तरुणींची मेडीकल करण्यात आली असून मेडीकलनंतर त्यांना कांदिवलीतील रेस्क्यू फाऊंडेशन महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश निवतकर यांनी सांगितले.
विशाखा ऊर्फ निलम ही मालाडच्या मालवणी परिसरात राहते. ती काही तरुणींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असून तिच्या संपर्कात असलेल्या तरुणींना ग्राहकांसोबत शहरातील विविध हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा संपूर्ण व्यवहार फोनवरुन होत असल्याने तिच्यावर अद्याप कारवाई झाली नव्हती. ही माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने विशाखाला संपर्क साधून तिच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती. यावेळी या बोगस ग्राहकाने तिच्याशी फोनवरुनच सविस्तर चर्चेसह पैशांची बोलणी केली होती. त्यानंतर त्याने तिला काही तरुणीसोबत गोराईतील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते.
ठरल्याप्रमाणे विशाखा ही दोन तरुणीसोबत रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता संबंधित हॉटेलमध्ये आली होती. यावेळी बोगस ग्राहकाशी आर्थिक व्यवहार सुरु असताना तिथे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी छापा टाकला होता. या कारवाईत विशाखाला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या तावडीतून दोन्ही तरुणींची सुटका केली. या तरुणींची चौकशी केल्यानंतर विशाखा ही त्यांना विविध ग्राहकांसोबत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायासठी पाठवत असल्याचे सांगितले.
ग्राहकांकडून मिळणार्या रक्कमेचा काही हिस्सा या तरुणीला दिल्यानंतर उर्वरित रक्कम ती स्वतकडे ठेवत होती. या कबुलीनंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक केली. तिच्यासह दोन्ही तरुणींना नंतर गोराई पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. याच गुन्ह्यांत विशाखा सध्या पोलीस कोठडीत आहे तर मेडीकलनंतर दोन्ही तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.