फ्लॅट भाड्याने देण्यावरुन ५४ वर्षांच्या व्यक्तीवर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत सुरक्षारक्षकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – फ्लॅट भाड्याने देण्याच्या वादातून विवेक आत्माराम घोसाळकर या ५४ वर्षांच्या व्यक्तीवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विवेक हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेला सुरक्षारक्षक आरोपी सूर्यकांत राजाराम घाडी (५१) याला अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
विवेक हे गोरेगाव येथील रामंदिर, सिग्मा आर दोन अपार्टमेंटच्या ७०२ फ्लॅट क्रमांकामध्ये राहतात. याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सूर्यकांत राहत असून तो सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याला त्याचा फ्लॅट भाड्याने द्यायचा होता. त्यासाठी त्याने विवेकला सांगितले होते. मात्र त्याने त्याचा फ्लॅट भाड्याने दिला नव्हता. त्याचा त्याला प्रचंड राग होता. याच वादातून सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सूर्यकांत हा विवेकच्या घरी गेला होता. यावेळी त्यांच्या फ्लॅट देण्याच्या कारणावरुन प्रचंड वाद झाला होता. याच वादानंतर रागाच्या भरात त्याने विवेकच्या गळ्यावर, खांद्यावर आणि मनगटावर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात विवेक हा गंभीररीत्या जखमी झाला होता. अचानक झालेल्या आरडाओरडीनंतर तिथे स्थानिक रहिवाशी जमा झाले होते. त्यानंतर सूर्यकांत घाडी तेथून पळून गेला होता.
ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या विवेक यांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सूर्यकांत घाडीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सूर्यकांतचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत सूर्यकांतला गोरेगाव येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.