मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जुलै २०२४
मुंबई, – पूर्वेकडून पश्चिमेला येताना ब्रिजवरुन बाईक कोसळून झालेल्या अपघातात एका बाईकस्वारासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. वैभव रामदास गमरे आणि आनंद इंगळे अशी या दोघांची नावे आहेत. हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह मित्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाईकस्वाराविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात सोमवारी पहाटे सव्वाचार वाजता गोरेगाव येथील लक्ष्मी जीआरओ इमारतीजवळील गोरेगाव पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्या ब्रिजवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. २८ वर्षांचा वैभव हा गोरेगाव येथील तीनडोंगरी, ए वन बेकरीसमोरील आदर्शनगर परिसरात त्याची पत्नी रोहिणीसोबत राहत होता. तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. आनंद इंगळे हा त्याचा मित्र असून तो अविवाहीत आहे. त्याचे कुटुंबिय त्याच्या गावी राहतात तर आनंद हा मुंबईत एकटाच राहत होता. सोमवारी पहाटे ते दोघेही त्यांच्या बाईकवरुन गोरेगाव पूर्वेकडून पश्चिमेकडे येत होता. बाईक भरवेगात चालविण्याचा प्रयत्नात बाईकस्वाराचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि ते दोघेही बाईकसह ब्रिजवरुन खाली पडले होते. अपघाताची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त होताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या वैभव आणि आनंद या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली होती.
वैभवची पत्नी रोहिणीला नंतर ही माहिती देण्यात आली होती. तिचा जबाब नोंदविण्यात आला असून तिने कोणावर संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. या जबानीनंतर पोलिसांनी बाईकस्वाराविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातात दोघांचाही मृत्यू झाला असून बाईक कोण चालवत होता, ते दोघेही कुठे गेले होते आणि कुठे जात होते याचा उलघडा होऊ शकला नाही. दोघांचे मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले. अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने गमरे आणि इंगळे कुटुंबियांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.