मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मार्च 2025
मुंबई, – अभिनेत्रीसह व्हाईस आर्टिस्ट म्हणून काम करणार्या एका 37 वर्षांच्या महिलेच्या सहा वर्षांच्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरणाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच प्रविण महादेव तेरेकर या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी प्रविण हा गोरेगाव येथील केशव गोरे स्मारकात कॅटरिंगचे काम करत असून या घटनेमागे त्याचा काय उद्देश होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
37 वर्षांची तक्रारदार अभिनेत्री असून ती तिच्या पती आणि सहा वर्षांच्या मुलीसोबत गोरेगाव परिसरात राहते. तिच्यासह तिचे पती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची मुलगी गोरेगाव येथील एका खाजगी शाळेत पहिलीत शिकते. शाळेनंतर ती जवळच असलेल्या गाण्यांच्या क्लासला जाते. तिच्या क्लासची वेळ सायंकाळी सहा ते सात अशी आहे. क्लासवरुन ती किंवा तिचे पती तिला आणण्यासाठी जातात. मंगळवारी पावणेसात वाजता ती नेहमीप्रमाणे तिच्या क्लासजवळ गेली होती. तिचा क्लास सुटला नसल्याने ती बाहेरच तिची वाट पाहत होती. काही वेळानंतर तिची शिक्षिका तिच्याकडे आली आणि तिने तिच्या मुलीला घेण्यासाठी कोणी आले आहे का याबाबत विचारणा केली. यावेळी तिने कोणालाही पाठविले नसल्याचे सांगितले.
याच दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीकडे इशारा करुन तिने तिच्या मुलीला घेण्यासाठी संबंधित व्यक्ती आल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्याच्याकडे जाऊन विचारणा केली होती. यावेळी या व्यक्तीने स्वतचे नाव प्रविण तेरेकर सांगून तो गोरेगाव येथील आरे रोडवरील केशव गोरे स्मारक येथे कॅटरिंगचे काम करत असल्याचे सांगितले. तिथे जाऊन चौकशी केल्यानंतर प्रविण हा तिथे कामाला असल्याचे कन्फर्म झाले होते. मात्र तो तिच्या मुलीला घेण्यासाठी तिथे का आला होता याचा उलघडा होऊ शकला नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला होता.
मात्र पोलिसांना तिथे येण्यास उशीर झाला होता. त्यामुळे त्यांनी त्याला ताब्यात घेऊन गोरेगाव पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रविणविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. तक्रारदार अभिनेत्रीची सहा वर्षांची मुलगी शाळेच्या गेटजवळ खेळत असताना प्रविण तिथे आला होता. त्याने तिला घरी सोडतो असे सांगितले होते. ती त्याला ओळखत नव्हती, त्यामुळे तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. त्यामागे प्रविणचा काय उद्देश होता. त्याला तिचे अपहरण करायचे होते का, कोणाच्या सांगण्यावरुन तो तिच्या मुलीचे अपहरण करणार होता याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.