मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जानेवारी २०२५
मुंबई, – पाच कोटीचे कर्ज मिळवून देतो असे सांगून प्रोसेसिंग फीसाठी घेतलेल्या सुमारे दहा लाखांचा अपहार करुन एका ६३ वर्षांच्या वयोवृद्धाची तीन भामट्यांनी फसवणुक केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. कमलेश गोसाई अग्रवाल, अमजद खान आणि अस्लम खान अशी या तिघांची नावे आहेत. ते तिघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
कमलेश रमणिकलाल कुराणी हे ६३ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार गोरेगाव येथील सिटी सेंटर मॉलजवळील साईबाबा इनकलेव्ह अपार्टमेंटमध्ये राहत असून ते सध्या निवृत्त झाले आहेत. त्यांना स्वतचा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. बँकेसह वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच प्रयत्नात असताना त्यांच्या परिचिताकडून त्यांची ओळख कमलेश गोसाई, अमजद खान आणि अस्लम खान यांच्याशी झाली होती. मे महिन्यांत त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना कर्जाविषयी माहिती सांगितली होती. यावेळी या तिघांनी त्यांना पाच कोटीचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांनी कर्जासाठी प्रोसेसिंग फी आणि सहा टक्के व्याजाची रक्कम आधी भरावी लागेल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना प्रोसेसिंग फीसह व्याजाचे दहा लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर काही दिवसांत त्यांना पाच कोटीचे कर्ज मिळेल आणि ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत या तिघांनी त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडून कर्ज मिळत नसल्याने त्यांनी प्रोसेसिंग फीसह व्याजासाठी दिलेल्या दहा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. या पैशांचा परस्पर अपहार करुन त्यांनी त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच कमलेश कुराणी यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कमलेश गोसाई अग्रवाल, अमजद खान आणि अस्लम खान या तिन्ही भामट्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.