१.४७ कोटीचे हिरे चोरी करणार्या कारागिराला राजस्थानातून अटक
आरोपी नोकराकडून चोरीचा १.४१ कोटीचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ डिसेंबर २०२४
मुंबई, – गोरेगाव येथे कंपनीच्या युनिटमधून १ कोटी ४७ लाखांचे हिरे चोरी करुन पळून गेलेल्या एका कारागिराला राजस्थान येथून गोरेगाव पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन जसवंत मकवाना असे या ४० वर्षांच्या आरोपी कारागिराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी १ कोटी ४१ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गोरेगाव येथे चोरी करुन पळून गेल्यानंतर तो सुरत, मध्यप्रदेश आणि नंतर राजस्थानात गेला होता. १२० हून अधिक सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन अखेर त्याला चोरीच्या मुद्देमालासह गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
६३ वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार किरण रतीलाल रोकानी हिरे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहतात. त्यांच्या मालकीची गोरेगाव येथील जवाहर नगर, रोड क्रमांक तेरा परिसरात किरण रतीलाल रोकानी नावाची एक डायमंड कंपनी आहे. त्यांचा मुलगा कृतिक हादेखील हिरे व्यापारी असून त्याची जेम्स नावाची एक कंपनी आहे. त्यांच्याकडे महेश काते हे मॅनेजर म्हणून कामाला असून त्यांच्यासोबत इतर नऊ कारागिर गोरेगाव येथील युनिटमध्ये काम करतात. या कारागिरामध्ये सचिन मकवाना याचा समावेश असून या सर्वांना महेश काते यांच्याकडून हिर्याचे काम दिले जाते. १० डिसेंबरला सकाळी सचिन हा गोरेगाव येथील कार्यालयात आला होता. काही वेळानंतर तो ४९१ कॅरेटचे १ कोटी ४७ लाख रुपयांचे हिरे घेऊन पळून गेला होता.
हा प्रकार महेश काते यांना समजताच त्यांनी ही माहिती किरण रोकानी यांना दिली होती. या घटनेनंतर किरण रोकानी यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात सचिनविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सचिनविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गोरेगाव पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत बागडे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम वैष्णव, विजेंद्र काळे, पोलीस हवालदा वारंगे, शेख, दुक, दळवी, कदम, सोनवले, उगले, पोलीस शिपाई पाटील, कोळेकर, चव्हाण, राणे यांनी आरोपी कारागिराचा शोध सुरु केला होता.
गोरेगावसह परिसरातील सुमारे १२० हून अधिक सीसीटिव्ही तपासणी करुन संबंधित पोलीस पथक गोरेगाव, मालाड, दहिसर, चारोटी टोल, भिलाड, वापी, सुरत, अहमदाबाद, पालनपूर, इडर आदी ठिकाणी पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र सचिन हा सतत वाहन बदलून प्रवास करताना पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता. गुजरात येथून तो मध्यप्रदेश आणि राजस्थानला पळून गेला होता. त्यामुळे तांत्रिक माहितीवरुन या पथकाने राजस्थान येथून सतत गुंगारा देणार्या सचिनला शिताफीने ताब्यात घेतले.
चौकशीत त्यानेच हिर्यांची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांी ७७ हजार ३८० रुपयांची कॅश, ४७० कॅरेट वजनाचे १ कोटी ४० लाख ७० हजार रुपयांचे हिरे असा १ लाख ४१ लाख ३७ हजार ३८० रुपयांचा चोरीचा ९७ टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिन हा मूळचा गुजरातचा रहिवाशी असून सध्या भाईंदर येथील कमला पार्क, ९० फिट रोड परिसरात राहत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक राम वैष्णव यांनी सांगितले.