गोरेगाव येथे दहा लाखांच्या हिर्‍यांच्या चोरी

डायमंड अ‍ॅसोटर कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2025
मुंबई, – गोरेगाव येथे एका हिरे व्यापार्‍याच्या कार्यालयातून सुमारे दहा लाखांच्या हिर्‍यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कार्यालयातील डायमंड अ‍ॅसोटर राजेंद्र पगाडे या कर्मचार्‍याविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. हिर्‍यांच्या ऑडिटदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दर्शन भरत सोनी हे हिरे व्यापारी असून त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड येथे राहतात. त्यांची गोरेगाव येथील उद्योगनगर, शिलाई इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आर. डी फाईन ज्वेल्स नावाच्या कंपनीचे कार्यालय आहे. या व्यवसायात त्यांचे भावोजी रितेश विनायक जिंजूवाडिया हे भागीदार आहेत. कंपनीत 55 ते 60 कामगार असून त्यात राजेंद्र पगाडे या डायमंड अ‍ॅसोटर या कर्मचार्‍याचा समावेश होता. 12 नोव्हेंबर 2024 रोजी तो कामावर रुजू झाला आणि 20 फेब्रुवारी 2025 रोजी अचानक काम सोडून निघून गेला होता. त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने तो आजारी असल्याचा बहाणा केला होता. त्याच्या पत्नीला किडनीचा त्रास असल्याने तो कामावर येणार नाही असे सांगितले होते. यावेळी दर्शन सोनी यांनी त्याला तिच्या वैद्यकीय कागदपत्रांची मागणी करुन त्याला उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

याच दरम्यान कंपनीचे मॅनेजर दिपक शहा यांनी कार्यालयातील हिर्‍यांचे ऑडिट केले होते. त्यात त्यांना काही हिरे कमी असल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच दिपक शहाने राजेंद्रला कॉल करुन कार्यालयात बोलाविले होते. मात्र वारंवार कॉल करुनही तो कार्यालयात आला नाही. कार्यालयातून दहा लाखांचे हिरे चोरीस गेले होते. यामागे राजेंद्रचा सहभाग असल्याचा संशय दिपक शहा यांनी दर्शन सोनी यांच्याकडे व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनीही त्याला कॉल करुन कार्यालयात येण्यास सांगितले होते,

मात्र त्याने तिथे येण्यास नकार दिला. या घटनेनंतर दर्शन सोनी यांनी राजेंद्रवर दहा लाखांच्या हिर्‍यांची चोरी केल्याची गोरेगाव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु सून राजेंद्रची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चोरीमागे त्याचा सहभाग उघडकीस आल्यास त्याच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page