केमिकल व्यावसायिकाला बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी
कर्जबाजारी झाल्यामुळे धमकाविणार्या तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑगस्ट 2025
मुंबई, – गोरेगाव परिसरातील एका नामांकित केमिकल व्यावसायिकाला बिष्णोई टोळीच्या नावाने 25 लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी तेजस यशवंत शेलार या 26 वर्षांच्या तरुणाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. तेजसला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन असून त्यातून त्याला तीन लाखांचे कर्ज झाले होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने तक्रारदार व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या अठरा तासांत गोरेगाव पोलिसांनी तेजसला अटक करुन या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. खंडणीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
58 वर्षांचे तक्रारदार केमिकल व्यावसायिक असून ते विलेपार्ले येथील जुहू स्किम परिसरात त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत राहतात. गोरेगाव येथील उद्योगनगर परिसरात त्यांच्या मालकीची एक केमिकल फॅक्टरी आहे. मंगळवारी 26 ऑगस्टला ते नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात गेले होते. सकाळी सव्वादहा वाजता त्यांना एक कॉल आला होता. मात्र कामात व्यस्त असल्याने त्यांनी तो कॉल रिसीव्ह केला नाही. त्यानंतर त्यांना पुन्हा संबंधित व्यक्तीने कॉल केला होता. कॉल घेतल्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना समजत नसलेल्या भाषेतून संभाषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काय बोलतोय हेच समजत नसल्याने त्यांनी तो कॉल बंद केला होता.
अशा प्रकारे दोन-तीन वेळा त्याने त्यांना कॉल केला होता. मात्र नंतर या व्यक्तीने हिंदीतून आपण बिष्णोई टोळीशी संंबंधित व्यक्ती असल्याचे सांगून तुम्ही जुहू परिसरात राहतात, तुमचे कार्यालय गोरेगाव तर फॅक्टरी वसई येथे आले असे आम्हाला माहित आहे. तुमच्या हत्येची मला 25 लाखांसह एक किलो सोन्याची सुपारी मिळाली आहे. यावेळी त्यांनी त्याला तुम्ही कोण बोलताय अशी विचारणा केल्यानंतर त्याने त्यांच्या कार्यालयासह घरी आणि फॅक्टरीबाहेर माझी काही माणसे पाठविली आहे अशी धमकी दिली होती. आम्हाला वरुन मॅसेज आल्याचे सांगून त्याने कॉल कट केला. मात्र वारंवार विचारणा करुनही त्याने स्वतची ओळख सांगितली नाही.
काही वेळानंतर त्याने पुन्हा कॉल करुन त्यांच्याकडे तडजोड म्हणून किती रुपये देऊ शकता याबाबत विचारणा केली होती. पैसे दिले नाहीतर परिणामाला तयार रहा अशी धमकी दिली. यावेळी त्यांनी त्याला पैसे देण्याची तयारी दर्शवून त्याला गोरेगाव पोलीस ठाण्याजवळ येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने कॉल कट केला. या बिष्णोई टोळीकडून खंडणीसाठी धमकी आल्याने तक्रारदार प्रचंड घाबरले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार गोरेगाव पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी गंभीर दखल घेत गोरेगाव पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत खरात, पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुविधा पुल्लेलू, सानप, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सावले, विजेंद्र काळे, नवनाथ कांगणे, पोलीस हवालदार तावडे, उगले, दळवी, कदम, पोलीस शिपाई बागुल, सालकर, चव्हण, उगले, राणे यांनी पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता.
धमकी देण्यात आलेल्या कॉलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर तो सिमकार्ड नवीन घेण्यात आले होते. त्याच्या सीडीआर काढून आरोपीचा शोध सुरु असताना त्याचे लोकेशन अंबरनाथ असल्याचे दिसून आले. त्यानंतर या पथकाने अंबरनाथ येथून तेजस शेलार या 26 वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच बिष्णोईच्या नावाने तक्रारदार व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
तपासात तेजस हा अंबरनाथ येथील कनसाई गाव, सुरेश किराणा स्टोअरजवळील रुम क्रमांक 240 मध्ये राहत होता. तो गोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याला ऑनलाईम गेम खेळण्याचे व्यसन होते, त्याला प्रचंड नुकसान झाले होते. गेमच्या नादात त्याला तीन लाख रुपयांचे कर्ज झाले होते. कर्जबाजारी झाल्याने त्यांनी तक्रारदाराच्या आर्थिक स्थितीसह कुटुंबियांची माहिती काढून त्यांना बिष्णोई टोळीच्या नावाने 25 लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. कर्ज फेडण्यासाठी एका केमिकल व्यावसायिकाला धमकी देणे तेजसला चांगलेच महागात पडले आहे.