शहरातील नामांकित वकिलाला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी

लैगिंक अत्याचाराची केस करण्याची धमकी देऊन खंडणी उकाळली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – शहरातील एका नामांकित वकिलाला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी येत असल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आले. शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो सोशल मिडीयासह समाजात व्हायरल करुन, त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचाराची केस दाखल करण्याची धमकी देऊन एका कुटुंबियांनी त्यांना ब्लॅकमेल करुन आतापर्यंत 32 लाखांहून अधिक खंडणी वसुली केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देणे, खंडणी उकाळणे तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पारुल राणा, निधी राणा, हरविंदरसिंग राणा, मिना राणा, कोणिका वर्मा अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण हिमाचल प्रदेशचे रहिवाशी आहे. या सर्व आरोपींना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार व्यवसायाने वकिल असून ते त्यांच्या कुटुंबियासोबत गोरेगाव परिसरात राहतात. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदे, विदेशी कायदे व्यापार आदींचे शिक्षण घेतले असून सध्या ते राजदूत म्हणून काम पाहतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध परिषदांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशन, वर्ल्ड ट्रेड ऑरगनायझेशन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जी 20, जी 7, ब्रिक्स, कॉमनवेल्थ, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, युनिसेफ, कॉर्प 30 मध्ये सहभाग घेतला आहे. सध्या ते ऑल इंडिया मॅन्युफेकचर संघटनेत प्रमुखपदी म्हणून कार्यरत आहेत. मे 2024 रोजी त्यांच्या कॉमन मित्रांमार्फत त्यांची पारुल राणाशी ओळख झाली होती. पारुल ही हिमाचल प्रदेशच्या सोलनच्या जोधन-जगतपूरची रहिवाशी होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती.

जून 2024 रोजी ते जिनेव्हा येथे गेले होते. यावेळी पारुने त्यांना कॉल केला होता, कॉलवर ती रडत होती, त्यामुळे त्यांनी तिची चौकशी केलीहोती. तिने तिच्या नातेवाईकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्यांच्याकडून पाच लाखांची आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी तिला अडीच लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. याच दरम्यान तिने तिच्या मॉडलिंग कामासाठी आणखीन अडीच लाख रुपये घेतले होते. संभाषणादरम्यान त्यांनी तिला ते विवाहीत असून त्यांना एक मुलगी असल्याचे सांगितले होते. तरीही ती त्यांना तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करत होती. यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्यानतर ती त्यांच्याकडे विविध कारण सांगून सतत पैशांची मागणी करत होते. कधी शूटींग तर गावी जायचे आहे असे सांगून ती त्यांना दहा आणि तीन लाख रुपये पाठविण्यास सांगत होती. त्यामुळे त्यांनी तिला एअरपोर्टला भेटून तीन लाख तर दहा लाख तिची बहिण निधीला दिले होते.

जुलै 2024 रोजी ते दोघेही बाली येथे फिरायला गेले होते. तिथे तिने त्यांच्याकडे पुन्हा वीस लाखांची मागणी केली होती. बाली र्टिपला प्रचंड खर्च झाल्याने त्यांनी तिला पैसे देण्यास नकार दिला होता. पारुकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने ते काहीसे सावध झाले होते. त्यांनी तिच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे काही अश्लील फोटो पाठविले होते. त्यांनी तिला पैसे दिले नाहीतर त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचाराची केस करण्याची धमकी देत होती. सोशल मिडीयासह समाजात त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करत होती.

बदनामीच्या भीतीने त्यांनी तिला जुलै 2024 ते जुलै 2025 या कालावधीत टप्याटप्याने पंधरा लाख रुपये दिले होते. तरीही ती त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी करत होती, ते तिला पैसे पाठवत होते. पैसे पाठविले नाहीतर तिचे वडिल हरविंदरसिंग राणा, आई मिना, बहिण निधी, कोणिका हे त्यांना कॉल करुन धमकावत होते. पारुवर लैगिंक अत्याचार केला आहे, तुला आता सोडणार नाही अशी धमकी देत होते. गेल्या वर्षभरात त्यांनी पारुलसह तिची बहिण तसेच कुटुंबियांना टप्याटप्याने 32 लाखांहून अधिक रक्कम दिली आहे. तरीही त्यांच्याकडून त्यांना सतत ब्लॅकमेल करुन खंडणीची मागणी होत असल्याने ते प्रचंड मानसिक तणावात होते.

या धमक्यांना कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून राणा कुटुंबियांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पारुल राणा, तिची बहिण निधी, कोणिका, वडिल हरविंदरसिंग आणि आई मिना यांच्याविरुद्ध फसवणुकीसह खंडणीसाठी ब्लॅकमेल करुन धमकी देणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत राणा कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या सर्वांना गोरेगाव पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page