२९ वर्षांच्या महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

गोरेगाव येथील घटना; हत्येनंतर संशयित पतीचे पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मे २०२४
मुंबई, – गेल्या एक वर्षांपासून लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या एका महिलेची तिच्याच संशयित पतीने नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून पलायन केल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. दिव्या टोपे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा संशयित पती जयराम लकाडा याच्याविरुद्ध वनराई पोलिसांनी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर जयराम हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही घटना मंगळवारी गोरेगाव येथील अशोकनगरात उघडकीस आली. याच परिसरात जयराम हा दिव्यासोबत गेल्या एक वर्षांपासून भाड्याच्या रुममध्ये राहत होते. ते दोघेही मूळचे ओरिसाच्या सुंदरगढ, सुरुलता सुंजोरे गावचे रहिवाशी आहे. एक वर्षांपूर्वी नोकरीसाठी ते दोघेही मुंबईत आले होते. तेव्हापासून ते गोरेगावच्या नेसको परिसरात मजुरीचे काम करत होते. राहण्याची व्यवस्था नसल्याने जयरामने २० हजार रुपयांचे डिपॉझिट आणि पाच हजार रुपयांच्या भाड्यावर अशोकनगरात एक रुम घेतला होता. तळमजल्यावर रबर मोल्डिंगचा कारखाना होता तर पोटमाळ्यावर ते दोघेही राहत होते. सात दिवसांपूर्वी जयरामने घरमालकाला भाडे दिले होते, त्यानंतर ते दोघेही स्थानिक रहिवाशांना दिसले नाही. ते कामावरही जात नव्हते. मंगळवारी त्यांच्या रुममधून दुर्गंधी येत होती. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती वनराई पोलिसांना दिली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर पोलिसांना एका चादरीमध्ये आणि नंतर प्लास्टिक पिशवीत दिव्याचा मृतदेह गुंडालेल्या अवस्थेत दिसून आला.

तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. तिच्या गळ्याभोवती नॉयलॉयची दोरीचा फास होता. त्यामुळे तिची गळा आवळून हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी तिची हत्या करुन जयरामने पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही हत्या उघडकीस येऊ नये म्हणून त्याने घरातील लाईट, पंखा आणि कुलर चालू ठेवला होता. पंचनामा केल्यानंतर दिव्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकेल. जयरामचा फोन बंद असून तो हत्येनंतर पळून गेला आहे. याप्रकरणी समीर प्रविणचंद्र बाटविया यांच्या तक्रारीवरुन वनराई पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमागील कारण समजू शकले नाही. दरम्यान मंगळवारी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page