गोरेगाव येथे 63 वर्षांच्या महिलेची वयोवृद्ध पतीकडून हत्या

बॉक्समध्ये मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मे 2025
मुंबई, – गोरेगाव येथे रागिनी ऊर्फ सोनू सावर्डेकर या 63 या वयोवृद्ध महिलेची तिच्याच वयोवृद्ध पतीने हत्या करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पती प्रताप परमानंद बास्कोटी (65) याच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या प्रतापच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रागिनीची हत्या करुन प्रतापने तिचा मृतदेह एका बॉक्समधून टाकून तो बॉक्स पंलगावर लपवून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आहे.

रागिनी ही गोरेगाव येथील मोतीलालनगर परिसरात तिच्या वयोवृद्ध आईसोबत राहत होती. तिचा रुम तिच्या आईच्या मालकीचा असून आईच्या निधनानंतर तिने बचतीच्या पैशांतून याच रुमचे अतिरिक्त रुम आणि गाळे बनविले होते. ते रुम आणि गाळे भाड्याने देऊन ती स्वतचा उदरनिर्वाह चालवत होती. यातील एका रुममध्ये एक भाडेकरु राहत असून तो प्रतापचा मित्र होता. प्रताप मित्राकडे येत असताना त्याने तिच्याशी ओळख वाढवली होती. त्यातून त्यांच्यात चांगली मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

प्रताप हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो विवाहीत आहे. त्याला दोन मुले असून पत्नीसह दोन्ही मुले उत्तरप्रदेशात राहतात. पूर्वी तो चित्रपटसृष्टीत काम करत होता. सध्या तो काहीच कामधंदा करत नव्हता. रागिनी एकटीच राहत असल्याने सुरुवातीला ते दोघेही लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होते. नोव्हेंबर 2012 रोजी त्यांनी विवाह केला होता. विवाहानंतर प्रताप हा रागिनीसोबत तिच्या राहत्या घरी राहत होता. रविवारी सकाळी तो घरातून निघून गेला आणि परत घरी आला नाही.

हा प्रकार स्थानिक रहिवाशांना संशयास्पद वाटला होता, त्यामुळे तिच्या शेजारी राहणार्‍या महिलेने रागिनीला कॉल केला होता, मात्र तिने तिला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर रागिनीच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती गोरेगाव पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रागिनीच्या घरात प्रवेश केल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या पलंगामधील एका बॉक्समध्ये सापडला. तिची हत्या करुन तिचा मृतदेह बॉक्समध्ये आणि नंतर पलंगात लपवून मारेकरी पळून गेला होता.

या घटनेनंतर प्रताप हा पळून गेल्याने त्यानेच राागिनीची हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल उद्यापर्यंत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून प्रतापने तिची गळा आवळून हत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेंनतर प्रतापविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page