चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांला छडीने मारहाण करणे महागात पडले
गोरेगाव येथील घटना; खाजगी क्लासच्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – विज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरे येत नसल्याने वर्गात चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याला छडीने मारहाण करणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी खाजगी क्लासच्या शिक्षकाविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक त्रिवेदी असे या शिक्षकाचे नाव असून त्याची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे.
उत्तरप्रदेशचे रहिवाशी असलेले तक्रारदार गोरेगाव परिसरात राहत असून त्यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा चौदा वर्षांचा मुलगा सध्या दहावीत शिक्षण घेत असून घरापासून काहीच अंतरावर असलेल्या अभिषेक कोचिंग क्लासेसमध्ये खाजगी शिकवणीसाठी जातो. सोमवारी सायंकाळी पाच वाजता तो घरी रडत आला होता. अभ्यास येत नसल्याने त्याच्या शिक्षकाने त्याला मारहाण केल्याचे समजले. त्यामुळे ते घरी आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. विज्ञान विषयाच्या प्रश्नांची उत्तरे येत नसल्याने त्याचे शिक्षक अभिषेक त्रिवेदी याने त्याला लाकडाच्या छडीने हातावर आणि मानेवर मारहाण केल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी अभिषेक त्रिवेदीकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात क्लासेसच्या शिक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अभिषेक त्रिवेदीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी शिक्षकाची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतरच त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.